Gudi Padwa: श्रीमंत दगडूशेठच्या वर्धापनदिनानिमित्त अनुभवा 'या' कलाविष्कारांचा संगीत महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:12 PM2022-03-31T13:12:00+5:302022-03-31T13:12:57+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापनपदिन ; गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवास रसिकांसाठी विनामूल्य कार्यक्रम

shrimant dagadusheth Sangeet Mahotsav start 2 april in ganesh kala krida manch pune | Gudi Padwa: श्रीमंत दगडूशेठच्या वर्धापनदिनानिमित्त अनुभवा 'या' कलाविष्कारांचा संगीत महोत्सव

Gudi Padwa: श्रीमंत दगडूशेठच्या वर्धापनदिनानिमित्त अनुभवा 'या' कलाविष्कारांचा संगीत महोत्सव

googlenewsNext

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. २ ते १० एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी नवोदित व युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले जात असून हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
 
संगीत महोत्सवाचे उदघाटन पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख  यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात शास्त्रीय संगीत, वादन जुगलबंदी, लोकगीते, भारुड, पोवाडे, नाटयगायनासह कथक नृत्याविष्काराचा समावेश आहे. संगीत महोत्सवाची सुरुवात शनिवार, दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मंगलध्वनी कार्यक्रमाने होणार असून त्यामध्ये केदार जाधव, नितीन दैठणकर, संजय उपाध्ये, अजय गायकवाड व अभिजीत जाधव यांची सनई व व्हायोलिनची जुगलबंदी होणार आहे. त्यानंतर प्रख्यात गायक पं. शौनक अभिषेकी व मंजुषा पाटील यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम होईल. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
 
संगीत महोत्सवात रविवार, दि. ३  एप्रिल रोजी पहिल्या सत्रात भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर येथील स्वरनिनाद तर्फे स्वातंत्र्य ७५ चे सादरीकरण होणार आहे. तर दुस-या सत्रात पुरुषोत्तम बर्डे यांचा मंगेशी हा लतादिदिंच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम होईल. सोमवार दि. ४ एप्रिल रोजी पराग पांडव व सहका-यांचा महाराष्ट्राची गीतगंगा हा कार्यक्रम आणि पं. रोणू मुजुमदार व पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांची बासरी व सरोदची जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मंगळवार दि. ५ एप्रिल रोजी चैत्राली अभ्यंकर व सहका-यांचा आनंदघन हा कार्यक्रम आणि त्यानंतर नंदेश उमप रजनी हा शाहीर नंदेश उमप व सहका-यांचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि. ६ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात युवा शाहीर होनराज मावळे यांचा गर्जली स्वातंत्रय शाहिरी आणि दुस-या सत्रात नृत्यगुरु शमा भाटे व नादरुप संस्थेतर्फे श्री रामलल्ला कथक नृत्याविष्कार होणार आहे. गुरुवारी (दि.७) तबला व पखवाज अशी वाद्य जुगलबंदीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यामध्ये सोहम गोराणे व राजेश महाराज बघे वादन करणार आहेत. त्यानंतर प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे यातून सांगीतिक सफरीची अनुभूती पुणेकर रसिकांना घेता येणार आहे.  

शुक्रवार, दि. ८ एप्रिल रोजी गायक ॠषिकेश बडवे व सावनी दातार यांचा नाटयसंगीताचा कार्यक्रम व पं. वेंकटेश कुमार यांचे शास्त्रीय गायन होईल. शनिवार दि. ९ एप्रिल रोजी दत्तात्रय कदम व गायत्री येरगुद््दी यांच्या संगीत संध्येने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर झी मराठीवरील चला हवा येऊ द्या चे कलाकार उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महोत्सवाचा समारोप रविवार दि. १० एप्रिल रोजी पहिल्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने व दुस-या सत्रात पं. हदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या संगीतमैफलीने होणार आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: shrimant dagadusheth Sangeet Mahotsav start 2 april in ganesh kala krida manch pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.