राणीच्या बागेत चिमुकली पावले; पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 06:07 AM2021-09-16T06:07:26+5:302021-09-16T06:08:06+5:30

एकीकडे पेंग्विनच्या देखभालीचा वाद रंगला असताना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात दोनदा पाळणा हलला आहे.

baby humboldt penguin newest member family byculla zoo pdc | राणीच्या बागेत चिमुकली पावले; पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला

राणीच्या बागेत चिमुकली पावले; पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे पेंग्विनच्या देखभालीचा वाद रंगला असताना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात दोनदा पाळणा हलला आहे. १ मे रोजी जन्मलेल्या पहिल्या बाळाचे नाव ओरिओ ठेवण्यात आले, तर १९ ऑगस्ट रोजी दुसरे बाळ जन्मले आहे. मात्र त्याची लिंग तपासणी केल्यानंतरच त्याचे नामकरण केले जाणार आहे.

राणीच्या बागेतील ही गोड बातमी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दिली. यापूर्वी २०१८ मध्ये फ्लिपर या मादीने पिल्लाला जन्म दिला होता. मात्र एका आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर १ मे २०२१ रोजी जन्मलेला ओरिओ पेंग्विन आता साडेतीन महिन्याचा झाला आहे. इतर पेंग्विनबरोबर तो आता बागडूही लागला आहे. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले.

असा आहे ओरिओ 

ओरिओ पेंग्विन किशोरावस्थेत असून वर्षभरात तो प्रौढावस्थेत दाखल होईल. त्याच्यावर सुरुवातीच्या काळात डॉक्टरांचे सतत लक्ष असे. डोनाल्ड आणि डेसी या पालकांबरोबर त्याला घरट्यात वेगळे ठेवण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक प्रत्येक दोन तासांनी त्याच्या पालकांना आहार पुरवीत होते. दररोज सकाळी पिल्लाचे वजन करून त्याच्या आहाराबाबत निर्णय घेतला जात होता. पेंग्विनची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांनीच ओरिओ हे नाव दिले. आता हा पेंग्विन इतर पक्ष्यांबरोबरच राहत आहे. प्रौढ पेंग्विनप्रमाणे मासे आणि इतर आहारही तो घेत आहे. विशेष म्हणजे, तो जास्तीतजास्त वेळ बबल या मादीसोबत राहत आहे.

नव्या बाळाची घेतली जातेय काळजी

वयाच्या तीन महिन्यापर्यंत पेंग्विनची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याने ते आजारांना बळी पडू शकतात. त्यामुळे त्याच्या पालकांना सकस आहार पुरविला जात आहे. तसेच, दररोज सकाळी या नवजात पेंग्विनचे वजन केले जाते. त्याचे पालक संपूर्ण संगोपन करीत असल्याने सकाळी फक्त त्याला एक आहार पुरविला जात आहे.

किशोरावस्थेतून प्रौढावस्थेत येण्याची प्रक्रिया पेंग्विनसाठी तणावपूर्वक असते. त्यासाठी काळजी घेतली जाते. कितीही राजकरण केले जात असले तरी हे पेंग्विनच आता मुंबईची ओळख झाली आहे. त्यांची काळजी घेण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. - किशोरी पेडणेकर, महापौर

Web Title: baby humboldt penguin newest member family byculla zoo pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.