चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ?

By सुधीर महाजन | Published: January 11, 2020 11:41 AM2020-01-11T11:41:31+5:302020-01-11T11:44:19+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले.

Chandrakant Khaire does not fool himself ? | चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ?

चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ?

googlenewsNext

- सुधीर महाजन 

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना काय झाले आहे? हा प्रश्न जसा प्रसारमाध्यमांना पडतो, तसा औरंगाबादच्या सामान्य माणसालाही पडला आहे. त्याचे उत्तर दुसरे-तिसरे कोणी नसून खैरेच देऊ शकतात; पण ते देणार नाहीत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले. शासकीय शिष्टाचारानुसार बैठकीची आसन व्यवस्था असते. तिचे पालन व्हावे हे अभिप्रेत असते आणि राजकारणातील मंडळी तेवढी परिपक्वता दाखवतात. या घटनेनंतर जलील यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यात केवळ खैरे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला नाही, तर शिवसेनेच्या प्रतिमेवर परिणाम झाला.

संगीत खुर्चीची ही घटना काही पहिलीच नाही. यापूर्वी दोन वेळा एकदा एका पंचतारांकित हॉटेलातील बैठकीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीच्या वेळी असाच प्रकार घडला होता; परंतु यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समक्षच ही घटना घडल्याने तिचे गांभीर्य वेगळे आहे. वास्तविक खैरे हे शिवसेनेचे नेते असले तरी कोणत्याही शासकीय पदावर नसल्याने त्यांना अशा प्रशासकीय बैठकांना उपस्थित राहता येत नाही; पण त्यांना टोकणारे प्रशासनातही कोणी नाही. त्यामुळेच असे वारंवार घडते. खरे तर उद्धव ठाकरेंनी त्याचवेळी सावरून घ्यायला पाहिजे होते. कारण यामुळे खैरेंपेक्षा जास्त शिवसेनेचे हसे झाले. ठाकरेंनी खैरेंना टोकले असते, तर ही नामुष्की टळली असती.

गेल्या ३५ वर्षांपासून चंद्रकांत खैरे हे राजकारणात आणि सातत्याने पदावर आहेत. नगरसेवकापासून ते मंत्री आणि खासदार, अशी त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत गेली आणि सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेला हा पहिलाच पराभव होता. अशा प्रकारातून नव्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडते. जी सध्या तळागाळातून वरपर्यंत फोफावत आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलेसाठी आरक्षण असताना पदाधिकारी महिलेचे अधिकार त्यांचे नवरे सर्रास वापरताना दिसतात. ‘झेरॉक्स पदाधिकारी’ असा या नवरोबांचा चेष्टेने उल्लेख केला जातो; पण त्याचा परिणाम होत नाही. सार्वजनिक जीवनात हा कोडगेपणा सर्रास दिसून येतो.

आता विषय निघालाच, तर औरंगाबादच्या राजकीय संस्कृतीचीही दखल घ्यायला हरकत नाही. ३५/४० वर्षांपूर्वी तत्कालीन राजकीय वातावरणाच्या गरजेतून मुंबईबाहेर औरंगाबादेत शिवसेनेचा उदय झाला. काँग्रेस पक्षाची आत्मभग्नता आणि बेपर्वाई ही औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेच्या उदयाची कारणे आहेत. सेनेने येथे आक्रमक राजकीय संस्कृती आणली आणि ती फोफावली. या आक्रमकपणात राजकीय परिपक्वतेचा ऱ्हास झाला आणि पुढची पस्तीस वर्षे शिवसेनेचे राजकारण या आक्रमकतेभोवती फिरत राहिले. याचा परिणाम या संघटनेवर झाला आणि तो आज प्रकर्षाने जाणवतो. आज सेनेकडे परिपक्व, प्रगल्भ नेतृत्वाची वानवा आहे. भविष्याचा वेध घेणारा उच्चशिक्षित असा एकही नेता मराठवाड्यात सेनेजवळ नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे एखादे द्रष्ट्ये नेतृत्व नाही आणि उगवत्या कार्यकर्त्यांमध्येही कोणी दिसत नाही. चार्टर्ड अकाऊंटंट रोहन आचलिया हे एकच नाव दिसते. या उलट सेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या एमआयएममध्ये खा. इम्तियाज जलील, डॉ. गफार कादरी, डॉ. हाश्मी, नासेर सिद्दीकी ही नावे घेता येतील. भाजपमध्ये तर उच्चशिक्षितांची भलीमोठी यादी आहे. याचाच अर्थ जी संस्कृती सेनेने जोपासली त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. उलट मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा हाताळला असता, तर एमआयएमला त्याचे भांडवल करता आले नसते. खैरे मात्र ही संधी त्यांना वारंवार उपलब्ध करून देतात, त्यांच्यासारख्या राजकारणी व्यक्तीला हे समजत नसावे, असे म्हणणे चूक आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतरही तिच्या आभासात राहत चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना?

Web Title: Chandrakant Khaire does not fool himself ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.