शेतमजुराचा मुलगा होणार डॉक्टर, पंकजा मुंडेंनी दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 09:16 PM2019-08-01T21:16:31+5:302019-08-01T21:21:08+5:30

कळंब तालुक्यातील भोगजी येथील गोरख मुंडे परिस्थितीशी दोन हात करीत आहे.

son of a farm laborer will be doctor, Pankaja Munde gives a help | शेतमजुराचा मुलगा होणार डॉक्टर, पंकजा मुंडेंनी दिला मदतीचा हात

शेतमजुराचा मुलगा होणार डॉक्टर, पंकजा मुंडेंनी दिला मदतीचा हात

googlenewsNext

उस्मानाबाद / कळंब : मेडिकल प्रवेशास पात्र ठरुनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे डॉक्टर बनण्याच्या स्वप्नावर विरझण पडण्याची वेळ भोगजी (जि. उस्मानाबाद) येथील गोरख मुंडे या तरुणावर आली आहे. यांसदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकल्यानंतर राज्यभरातून गोरखसाठी मदतीचा ओघ सुरु झाला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही ‘लोकमत’च्या या बातमीस गुरुवारी सायंकाळी ट्विट करीत दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कळंब तालुक्यातील भोगजी येथील गोरख मुंडे परिस्थितीशी दोन हात करीत आहे. अत्यंत तल्लख बुद्धीच्या गोरखने मोठ्या जिद्दीने अभ्यास करीत मेडिकलची प्रवेश परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. मात्र, आईचे छत्र लहानपणीच हरविलेल्या गोरखचा संघर्ष कायमच राहिला. घरची केवळ १२ गुंठे जमीन त्यातून पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे वडील शेतमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशा परिस्थितीत मेडिकलच्या प्रवेशासाठी ४ लाख ६६ हजार रुपयांची आवश्यकता आहे. घरी तर छदामही नाही. याविषयी सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर राज्याच्या कानाकोप-यातून गोरखच्या मदतीसाठी हात पुढे येत आहे. आपापल्या ऐपतीप्रमाणे अनेक दानशूरांनी आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, हे वृत्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याही वाचनात आली. त्यांनी तातडीने ही बातमी ट्विट करीत १ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत गोरखला जाहीर केली आहे. ‘कृपया माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा. आपला प्रश्न मला व्यथित करतो. मी माझ्या परिने तो सोडविण्यासाठी प्रयत्न करते. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आपल्या पुढील शिक्षणासाठी १,५१,००० रुपयांची मदत आपल्याला करण्याची इच्छा आहे.’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत गोरखला मदतीचा हात देऊ केला आहे.

(बिकट आर्थिक स्थितीमुळे शेतमजुराच्या मुलाचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’)

Web Title: son of a farm laborer will be doctor, Pankaja Munde gives a help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.