दामदुप्पट आमिषाच्या दरीत उड्या टाकण्यासाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 09:27 AM2021-11-24T09:27:20+5:302021-11-24T09:28:25+5:30

एक लाख रुपये भरल्यावर दरमहा तीन हजार रुपये व्याज आणि ३६ महिन्यानंतर एक लाख रुपये मुद्दल परत! - हा धुमाकूळ राज्यात पुन्हा सुरू झाला आहे !!

The rush to jump into the valley of double lure | दामदुप्पट आमिषाच्या दरीत उड्या टाकण्यासाठी झुंबड

दामदुप्पट आमिषाच्या दरीत उड्या टाकण्यासाठी झुंबड

googlenewsNext

कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुण्यापासून नाशिक ते अगदी नागपूरपर्यंत गेल्या काही महिन्यांत दामदुप्पट गुंतवणूक योजनांचा धुमाकूळ सुरू आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये व्याजापोटी मिळणार आणि ३६ महिन्यानंतर पुन्हा एक लाख रुपये मुद्दल परत मिळणार असे ढोबळमानाने या योजनांचे स्वरुप असते (आकडे थोडे मागे-पुढे इतकेच). वेगवेगळ्या नावाने किमान पाच ते सहा कंपन्या अशी गुंतवणूक करून घेत आहेत. आम्ही शेअर मार्केटमधील चढ-उताराचा अभ्यास करून  फायदा मिळवतो व त्याचा लाभ कोरोनाने हतबल झालेल्या लोकांना मिळवून देतो असे त्यांचे मार्केटिंग आहे. त्यांच्या या फसवणुकीच्या तंत्राला लोक मोठ्या संख्येने बळी पडले आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान एक हजार कोटींची गुंतवणूक या योजनांमध्ये झाल्याचा अंदाज आहे. या योजनांची भुरळ पडलेला वर्ग मुख्यत: सुशिक्षित आहे. शिक्षक, सरकारी नोकरदार, डॉक्टरांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनीच त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. बँका, पतसंस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, शिक्षक बँकेकडून कर्जे आणि खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन लोकांनी यामध्ये गुंतवले आहेत. दागिने विकूनही गुंतवणूक झाली आहे.  समाजातल्या मोठ्या वर्गाला कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याची हाव आहे. ती हावच या कंपन्यांनी कॅश केली आहे. 

या कंपन्या कोण चालविते, ते पैसा कशात गुंतवतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात परतावा कशातून मिळतो याची कोणतीही चौकशी न करता मेंढरासारखी गावेच्या गावे या कंपन्यांच्या मागे पळतात. अशा योजनांमध्ये सुरुवातीला आकर्षक परतावा दिला जातोच. त्यामुळे अमक्याला एवढे पैसे मिळाले, मग, मी मागे का राहू म्हणून पैसे गुंतवणूक करण्यासाठी झुंबड उडते. छोट्या गावांतून दीड-दोन कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक जमा करून दिल्यास चक्क सहा लाखांची गाडी भेट दिली जात आहे. जंगी पार्ट्या, हैदराबादची विमान सफर, मोटारसायकली भेट असे  भुरळ घालणारे  विश्व या कंपन्यांकडून उभे केले गेले आहे. अनेक शिक्षक  शाळा सोडून ही गुंतवणूक गोळा करण्याच्या मागे लागले आहेत. यात महिलांची गर्दी मोठी ! पिअरलेस, कल्पवृक्ष, संचयनी, जपान गादी, पॅनकार्ड क्लब, समृद्ध जीवन अशा  अनेक कंपन्यांनी आजवर वेगवेगळ्या नावाने फसव्या योजना आणल्या. त्यातून लोकांची लुबाडणूक झाली. ज्यांनी कंपन्या काढल्या ते डल्ला मारून गब्बर झाले व गुंतवणूकदार आयुष्यातून उठले. आतापर्यंत अशा अव्यवहार्य आमिषापोटी ज्यांनी आयुष्याची पुंजी पणाला लावली त्यांना एखादा अपवाद वगळता काहीही परत मिळालेले नाही. पुढे दरी आहे हे माहीत असतानाही लोक त्यात उड्या घेत असल्याचा जुनाच अनुभव नव्याने येत आहे. ज्यांनी आतापर्यंत फसवणूक केली, त्यांनीच नव्याने या कंपन्या सुरु केल्या आहेत. म्हणजे लोक तेच आहेत फक्त कंपन्यांची नावे नवीन व फसवणुकीचे तंत्र वेगळे ! 

आता जी गुंतवणूक होत आहे, त्यास कसलाही कायदेशीर आधार नाही. तीन वर्षात दामदुप्पट व्याज देणारी जगात एकही वित्तीय संस्था नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लगेच पैसे दुप्पट होत असते तर, सर्वजण कष्टाची कामे सोडून शेअर मार्केटमध्येच पैसे कमवत राहिले असते; पण, पैशाची हाव अनावर असलेल्यांना हे सांगणार कोण?, एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याला द्यायचे असतात... जेव्हा पुढचा देणारा बंद होतो तेव्हा मागच्यांचे मिळत नाहीत असा हा साधा सरळ व्यवहार आहे आणि आताही तसेच होणार आहे परंतु या घडीला त्याचे कुणाला सोयरसुतक नाही. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची राजरोस फसवणूक सुरु असताना संबंधित सरकारी यंत्रणांनीही डोळ्यावर झापड बांधले आहे. कुणाची तक्रार नाही म्हणून सारेच हातावर घडी घालून  बसले आहेत.  या फसवणुकीचा फुगा फुटल्यावर त्यातून सामाजिक स्वास्थ हरवून जाईल याचे भान त्यांना नाही.  
राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे.
 

Web Title: The rush to jump into the valley of double lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.