अत्याचार करणाऱ्या बापाचे माझ्या नावापुढील नाव काढून टाका; पीडित मुलीची न्यायाधीशांना आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:26 AM2021-07-29T08:26:22+5:302021-07-29T08:27:59+5:30

सज्ञान होताच न्यायाधीशांना केली विनंती; न्यायालयाने आराेपी वडिलास ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Remove the name of the abusive father next to my name; The victim's daughter appealed to the judge | अत्याचार करणाऱ्या बापाचे माझ्या नावापुढील नाव काढून टाका; पीडित मुलीची न्यायाधीशांना आर्जव

अत्याचार करणाऱ्या बापाचे माझ्या नावापुढील नाव काढून टाका; पीडित मुलीची न्यायाधीशांना आर्जव

googlenewsNext
ठळक मुद्दे निर्दयतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या तोंडावर कपडा बांधून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर तिने पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. 

वर्धा : स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नात्याला काळिमा फासण्याची घटना देवळी तालुक्यातील दहेगाव (धांदे) येथे चार वर्षांपूर्वी घडली. या प्रकरणात न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली. तिच्या या विनंतीमुळे दुष्कृत्य करणाऱ्या बापाविषयी किती घृणा आहे, हे स्पष्ट हाेते. या प्रकरणात अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी निकाल देताना नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली. 

शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी देवळी तालुक्यातील दहेगाव (धांदे) येथील रहिवासी आहे. आरोपी हा पीडितेचा जन्मदाता बाप आहे. तिच्या आईचा ती लहान असतानाच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने दुसरे लग्न केले. आरोपी हा पूर्वी दारूविक्रीचा व्यवसाय करायचा, तसेच आरोपीच्या त्रासामुळे पीडिता ही एका बालगृहात राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, १ ऑगस्ट २०१७ ला आरोपी १३ वर्षीय पीडितेला घरी घेऊन गेला. त्यानंतर मध्यरात्री घरातील इतर सदस्य झोपून असताना कुणाला आवाज येऊ नये म्हणून निर्दयतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या तोंडावर कपडा बांधून तिच्यावर बलात्कार केला. शिवाय घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. 
आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर तिने पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नाेंद घेतली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना निरंजने यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

शिक्षेचे स्वरूप असे
या प्रकरणावर निकाल देताना न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेप तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडिताला भविष्यात जगण्यासाठी तसेच शिक्षणाकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा अंतर्गत तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले.

सहा साक्षीदारांची तपासली गेली साक्ष
या प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात मांडली. न्यायालयात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले.

Web Title: Remove the name of the abusive father next to my name; The victim's daughter appealed to the judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.