पोटच्या मुलाची फलाटावर आपटून हत्या, सानपाडा स्थानकातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:02 AM2021-09-21T07:02:04+5:302021-09-21T07:02:24+5:30

फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले.

Killing of 4 year child on a platform, shocking incident at Sanpada station | पोटच्या मुलाची फलाटावर आपटून हत्या, सानपाडा स्थानकातील धक्कादायक घटना

पोटच्या मुलाची फलाटावर आपटून हत्या, सानपाडा स्थानकातील धक्कादायक घटना

Next

नवी मुंबई : पत्नी सोबत झालेल्या वादातून बापाने चार वर्षीय मुलाची आपटून हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सानपाडा स्थानकात घडली. तीन वेळा मुलाला उचलून फलाटावर आपटल्यानंतर एका महिलेने त्याला अडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तिच्या हातातूनही मुलाला हिसकावून तो मुलाला उचलून आपटत राहिल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सानपाडा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ व ४ दरम्यान सोमवारी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील काही व्यक्ती भीक मागण्यासाठी रेल्वे स्थानकात शिरले होते. यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले. यावेळी व्यक्तींनी त्याला अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. अखेर हा क्रूर प्रकार पाहून एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सकलसिंग हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी सकलसिंग पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृत प्रशांत हा सकलसिंगच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा आहे. त्याची पहिली पत्नी गावी असून, तो सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईत राहत आहे. रविवारी रात्रीपासून सकलसिंग याचा दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत वाद सुरू होता. सोमवारी सकाळी सर्व जण सानपाडा स्थानकात आले असता, त्या ठिकाणीही त्यांचा वाद सुरू होता. याच रागातून सकलसिंग याने मुलगा प्रशांत याला उचलून आपटून त्याची हत्या केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले.
 

Web Title: Killing of 4 year child on a platform, shocking incident at Sanpada station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.