भरमसाठ शुल्क वसूल करून शिकविण्यात कुचराई; शिकवणी चालकाला ग्राहक मंचाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:30 PM2019-05-29T23:30:25+5:302019-05-30T11:37:29+5:30

शुल्कापोटी भरलेले ८० हजार रुपये ३० दिवसांत तिला परत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गुरुकुल या खाजगी शिकवणी वर्गचालकास दिला आहे.

Consumer Forum Bacha Tackle | भरमसाठ शुल्क वसूल करून शिकविण्यात कुचराई; शिकवणी चालकाला ग्राहक मंचाचा दणका

भरमसाठ शुल्क वसूल करून शिकविण्यात कुचराई; शिकवणी चालकाला ग्राहक मंचाचा दणका

ठळक मुद्देवर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच काही विषयांचे प्रमुख शिक्षक वर्ग सोडून निघून गेले१२ वीच्या परीक्षेपर्यंत केवळ ३२ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला होता.

औरंगाबाद : गायत्री काकडे या विद्यार्थिनीने शुल्कापोटी भरलेले ८० हजार रुपये ३० दिवसांत तिला परत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गुरुकुल या खाजगी शिकवणी वर्गचालकास दिला आहे. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्याचेही आदेशात म्हटले आहे.‘भरमसाठ शुल्क वसूल करून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या सेवेत कुचराई केल्याचा तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे’ निरीक्षण नोंदवून, मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्या संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.

गायत्री अनिल काकडे ही विद्यार्थिनी दहावीमध्ये ९३ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. ‘नीट’ परीक्षेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिने अकरावी-बारावीसाठी जालना रस्त्यावरील गुरुकुल शिकवणी वर्गामध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन त्यांच्याकडून भरपूर अभ्यास करून घेण्यात येईल, असे आश्वासन प्रवेशाच्या वेळी शिकवणी वर्गचालकांनी दिले होते. तसेच अकरावी, बारावीची टिपणे आणि पुस्तके देण्याचेही सांगण्यात आले होते. दीड लाख रुपये शुल्क सांगण्यात आले, मात्र त्यात सवलत देऊन ८० हजार रुपये घेऊन प्रवेश दिला.

वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच काही विषयांचे प्रमुख शिक्षक वर्ग सोडून निघून गेले, त्यामुळे अभ्यासक्रम मागे पडला. नियोजित टिपणे देण्यात आली नाहीत. १२ वीच्या परीक्षेपर्यंत केवळ ३२ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. वर्गचालकांकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले गेले नाही. त्यामुळे अनिल काकडे यांनी मुलीला दुस-या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी शुल्क परत मागितले असता दिले नाही म्हणून काकडे यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. सदर विद्यार्थिनीला अभ्यासक्रम झेपला नाही म्हणून ती वर्ग सोडून गेली, असा युक्तिवाद वर्गचालकांतर्फे करण्यात आला. सुनावणीअंती मंचाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title: Consumer Forum Bacha Tackle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.