सत्ता-संपत्तीच्या मोहात अडकलेल्या साधूंच्या जगात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 06:03 AM2021-09-26T06:03:00+5:302021-09-26T06:05:15+5:30

निरंजनी आखाड्याच्या नरेंद्रगिरी महाराजांची आत्महत्या, त्यांच्या शिष्यावरच असलेले आरोप; हे पाहून मात्र कुणालाही प्रश्न पडेल, हे कसलं गुरूशिष्याचं नातं? चेला असा गुरूला ‘संपवू’ शकतो? तेही इस्टेटीसाठी?..

In the world of sadhus who are trapped in the temptation of power and wealth... | सत्ता-संपत्तीच्या मोहात अडकलेल्या साधूंच्या जगात..

सत्ता-संपत्तीच्या मोहात अडकलेल्या साधूंच्या जगात..

googlenewsNext
ठळक मुद्देसाधू समाजातल्या सत्तासंघर्षाची कहाणी!...

- मेघना ढोके

फार जुनी गोष्ट आहे. मे २००३ च्या आसपासची. नाशकातला कुंभमेळा जवळ आला होता. पूर्वतयारी म्हणून करायच्या बातम्यांसाठी माहिती मिळवायची म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांत फिरणं सुरू होतं. नाशकात तपोवन, पंचवटीत तर त्र्यंबकेश्वरचे अनेक आखाडे तर उंच डोंगरांच्या पोटात होते. त्याच काळात नाशकातल्या लक्ष्मीनारायण मंदिरात स्थानधारी महंत होते नारायणदास महाराज. साधू समाजाविषयी त्यांचा अभ्यास दांडगा होता. (गृहस्थ माणसांचा मिळून जसा समाज बनतो तसा साधूंचा एक समाज असतो, त्यांचे नियम, पंचायती असतात. त्या शिस्तीत जगावं लागतं.) नारायणदास महाराजजींनी साधू समाजाची रचना, व्यवस्था, त्या व्यवस्थेत येणारी, साधू होणारी माणसं, त्यांचं शिक्षण असं सारं उलगडून सांगितलं.

तेव्हा त्यांना सहज विचारलं होतं, ‘बाबाजी, क्या कोई भी साधू बन सकता है?’

ते हसले आणि म्हणाले, ‘कुणीही उठावं आणि साधू व्हावं इतकी ही सोपी गोष्ट नाही. भगवे कपडे घातले, गांजा ओढला म्हणजे झाला का कुणी साधू? साधुता संभली नहीं संभलती बेटा, ग्यान हो तो विरक्ती बढती है, मोह हो तो उलझन, दोनो चीजे मन की शांती नहीं रहने देती..’

- अजून जसेच्या तसे आठवतात त्यांचे शब्द : साधुता संभली नहीं संभलती..

निरंजनी आखाड्याच्या नरेंद्रगिरी महाराजांनी आत्महत्या केल्याच्या, त्यांच्या शिष्याला आनंदगिरीला अटक झाल्याच्या बातम्या वाचताना हे सारं आठवतंच.

नरेंद्रगिरी महाराजांची आत्महत्या, त्यांच्या शिष्यावरच असलेले आरोप; हे सगळं चित्र पाहून मात्र कुणालाही प्रश्न पडेल की, हे कसे साधू? असं कसं गुरूशिष्याचं नातं? चेला असा गुरूला ‘संपवू’ शकतो? तेही इस्टेटीसाठी?

साधू समाजात फिरताना, त्या व्यवस्थेतल्या अनेकांशी बोलताना साधू समाजातलं गुरूशिष्याचं नातंही दिसू लागतं. काही नाती निकोप, काही सत्तेभोवती फिरणारी, सोयीची.

‘‘जमीन जायदाद बहोत लगी है आखाडोंमे..’’- असं तर आखाड्यात भांडी घासणारा एखादा तरुण साधूही सहज सांगतो. पूर्वी तर त्यावरून खूनबिन होत, लढ पडते थे एकदुसरेसे... साधूंच्या जगातलं हे ओपन सिक्रेट तसं सगळ्यांनाच माहिती असतं.

काही बड्या आखाड्यांकडे कित्येक एकर जमिनी असतात. तिथं शेती होते. त्यासाठी सालदार ठेवले जातात. आखाड्यांच्या इमारती असतात, त्यातल्या खोल्या भाड्यानं दिल्या जातात. त्यांचं भाडं येतं. गोशाळा चालवल्या जातात. उत्पन्नाचे हे असे अनेक मार्ग. मात्र, आखाड्याचा महंत जेवढा मोठा, त्याचा भक्त परिवार जेवढा मोठा, राजकीय वर्तुळातला महंतांचा प्रभाव जितका जास्त, त्यांना मानणारे श्रीमंत लोक जितके जास्त तितकं आखाड्याचं उत्पन्न अधिक. ते जितकं जास्त तितका प्रमुख अर्थात गादीधारी महंत (गद्दीनशीन असंच म्हणतात हिंदी पट्ट्यात) जास्त ‘इन्फ्लूएन्शल’, आखाडाही जास्त श्रीमंत.

या सगळ्या पैशाअडक्यावरून घोळ होतात हे माहीत असलेले काही गादीधारी महंत वेळीच आपले वारसदार निवडतात, उत्तराधिकारी जाहीर करतात. काही जण तर कायदेशीर मृत्यूपत्रही करून ठेवतात. आपल्या जीवात जीव आहे तोच उत्तराधिकाऱ्याकडे कारभार सोपवून त्याचं लांबून प्रशिक्षण करतात.

जे महंत आपल्या चेल्यांमधली सत्तास्पर्धा वेळीच उत्तम हाताळून त्यापैकी एकाला उत्तराधिकारी करतात, ते उतारवयात सुखानं जगतात. कुंभ-कुंभ फिरतात, स्नान करतात, मागितला तर सल्ला देतात. नाहीतर वाचत, भजन-नामजप करत शांतपणे जगाचा निरोप घेण्याची तयारी करतात.

- काही साधूंना मात्र हे असं मोहमायेतून वेळीच बाहेर पडणं जमत नाही. मोह पडतो आपल्या स्थानाचा, सत्तेचा. काहींना उत्तराधिकारी कोण निवडावा हा प्रश्न सुटत नाही किंवा उगीच आखाड्यात चेल्यांमध्ये ‘क्लेश’ नको म्हणून होता होईतो ते उत्तराधिकारी कोण हा प्रश्न सोडवतच नाहीत. चेल्यांमध्ये मग सत्ताखेच चालू राहते, त्यात आपोआप महंतांचं महत्त्व वाढत जातं.

अर्थात तरीही कुणा आखाड्यातल्या साधूने काही उद्योग केले, अफरातफर, शिस्तभंग केले, तर साधूंच्या पंचायतीकडे मामला जातो. प्रत्येक आखाड्यानं त्या पंचायतीत आपले सदस्य निवडून पाठवलेले असतात. साधूंच्या गैरवर्तनाला तिथं शिक्षा होते. दंड सुनावले जातात. गुन्ह्याप्रमाणे शिक्षा असतात. त्यांचे नियम ठरलेले असतात. आखाड्यातून बाहेर काढणं ही सगळ्यात जबर शिक्षा. बहिष्कार, पंगतबंदी, कुंभस्नानबंदी, गुरूने गंडा काढून घेणं अशा शिक्षा होतात. आयुष्यातून उठलेले आणि कट कारस्थान करून आयुष्यातून उठवलेले असे अनेक या शिक्षा भोगतात. कटकारस्थानं सर्रास होतात, सत्तास्पर्धा, गादी स्पर्धा तरुण साधूंमध्ये असतेच; हे तर अनेक जण खुल्लमखुल्ला बोलतात. त्यात काही ‘भयंकर’ आहे असं साधू समाजात रुळलेल्या कुणाला फारसं वाटत नाही.

साधू म्हणून आखाड्यात राहणाऱ्या, स्वयंपाक-झाडूफरशी-भांडी ते गुरूसेवा-गोसेवा करणाऱ्या काहींना वाटतं की, असे कष्ट किती उपसणार, आपणही ‘दावेदार’ व्हावं.. पण ते सोपं नसतंच, असं वाटणारे अनेक असतात.

मुळात प्रमुख झालं तरी आखाड्याची मालमत्ता काही नावावर होत नाही. राजकीय-सामाजिक वजन, मानमरातब-सुखसोयी तेवढ्या वाढतात. मालमत्ता, जमीन आखाड्याचीच राहते, ती कुणा एका साधूची वैयक्तिक मालमत्ता नसते. मात्र, त्यातून येणारी आर्थिक-राजकीय सत्ता हाच मोठा मोह असतो. मूळ स्थानी असणाऱ्या तरुण साधूंना त्याचा जास्त मोह पडतो. पण, दूर कुठंतरी लांब असलेल्या स्थानी (आखाड्याची शाखा म्हणता येईल त्याला) एकट्या राहणाऱ्या स्थानधारींसाठी मात्र सोपं नसतं आयुष्य. त्यांना आहे ती जमीन सांभाळावी, कसावी लागते किंवा कसून घ्यावी लागते. अनेक जण अंधाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. स्वत:च्या हातानं करून खातात. ते साधूंच्या पॉवरफुल जगाच्या परिघाबाहेर असतात. जमिनीचे वाद, अतिक्रमणाचे प्रश्न असतील तर कोर्टकज्जे करत राहतात. आणि त्यात सारं तारुण्य जातं..

मूळ स्थानी राहणाऱ्या पण फार महत्त्वाकांक्षी नसलेल्या अनेकांच्या वाट्यालाही दोन वेळचं जेवण-निवासाची सोय, बाकी कष्टाची कामं यापलीकडे काही येत नाही. मात्र ज्यांच्या महत्त्वाकांक्षा प्रबळ, जे दिसायला आकर्षक, तब्येत कमावलेली, वक्तृत्व फरडे, गुरूकृपा जास्त ते सत्तास्पर्धेचा भाग होतात. पुढे राजकारण - सत्तासंघर्ष अटळ. तो कधी उघड दिसतो, कधी बंद दाराआड मिटतो इतकंच.

जग साधूंचं असलं तरी सत्ता आणि महत्त्वाकांक्षांचा टकराव ‘मानवी’च असतो..

समाज साधूंचा असो नाहीतर संसारींचा..

असतो माणसांचाच..

(संपादक, लोकमत डिजिटल सखी)

meghana.dhoke@lokmat.com

Web Title: In the world of sadhus who are trapped in the temptation of power and wealth...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.