Goa Election 2022 : भाजपमधील सिद्धेश नाईकांचे बंड मावळले; अखेर प्रदेश सचिवपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 06:23 PM2022-01-28T18:23:03+5:302022-01-28T18:23:22+5:30

Goa Election : उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश यांची तुलना करू नका, तानावडे यांचं वक्तव्य.

Goa Election 2022: Siddhesh Naik's revolt in BJP subsides; Finally appointed as State Secretary | Goa Election 2022 : भाजपमधील सिद्धेश नाईकांचे बंड मावळले; अखेर प्रदेश सचिवपदी नियुक्ती

Goa Election 2022 : भाजपमधील सिद्धेश नाईकांचे बंड मावळले; अखेर प्रदेश सचिवपदी नियुक्ती

Next

पणजी : कुंभारजुवेत सिद्धेश नाईक यांचे बंड अखेर मावळले आहे. भाजपने त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली असून वास्को मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर कुंभारजुवेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या उपस्थितीत सिद्धेश यांनी आपण पक्षासोबतच राहाणार असल्याचे स्पष्ट केले. सिद्धेश यांनी अखेर तलवार म्यान केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी दिले होते. भाजपने त्यांचे मन वळविण्यात यश मिळवले आहे. पत्रकार परिषदेत सिद्धेश यांनी कुंभारजुवेत आपण पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासोबत असेन असे जाहीर केले.

बुधवारी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताच भाजपमधील बंडाळी उफाळून आली होती. कुंभारजुवेत केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जि.प. सदस्य सिद्धेश यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली, तेव्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा आग्रह त्यांनी त्यांच्याकडे धरला होता. परंतु सिद्धेश यांचे मन वळविण्यात भाजप नेत्यांना यश आले.

भाजपने कुंभारजुवेत विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जेनिता यांना भाजपने तिकीट दिले आहे. जेनिता पक्षाच्या राज्य सचिव आहेत. तसेच जुने गोवेच्या सरपंच आहेत. सिद्धेश हे या मतदारसंघात भाजप तिकिटाचे प्रबळ दावेदार होते. प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, सिद्धेश यांनी तिकीट मागण्यात काही गैर नाही. श्रीपाद नाईक यांचे पुत्र म्हणून ते पुढे आलेले नाहीत तर अभाविपवर त्यांनी काम केले आहे. पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या निभावल्या आहेत, त्यामुळे आता त्यांची सचिवपदी नियुक्ती करून वास्को मतदारसंघाची जबाबदारी आम्ही सोपविली आहे.

मडकईकरांच्या वक्तव्याची गंभीर दखल
सिद्धेश अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास ५०० मतेसुध्दा मिळवू शकणार नाहीत, असे जे विधान पांडुरंग मडकईकर यांनी केले होते, त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली. अशा प्रकारची विधाने करू नका, असे आपण मडकईकर यांना बजावले आहे, असे तानावडे यांनी सांगितले. बहुतांश ठिकाणी बंड मावळले आहे. सांताक्रुझमध्ये अनिल होबळे व गिरीश उस्कैकर यांचा विरोध मावळल्याचा दावा तानावडे यांनी केला.

'उत्पल पर्रीकर, सिद्धेश यांची तुलना नको'

उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश यांची तुलना करू नका. सिद्धेश यांनी विद्यार्थी चळवळीपासून अनेक पदांवर पक्षासाठी काम केलेले आहे, असे तानावडे म्हणाले. सिद्धेश म्हणाले की, ‘पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडीन. वास्को मतदारसंघात काम करीन.

Web Title: Goa Election 2022: Siddhesh Naik's revolt in BJP subsides; Finally appointed as State Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.