CoronaVirus : ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिला प्रदूषणमुक्तीचा मार्ग;जगभरातील प्रदूषण ५० टक्क्यांनी झाले कमी

By गजानन दिवाण | Published: April 14, 2020 04:31 PM2020-04-14T16:31:34+5:302020-04-14T16:36:02+5:30

चीन, इटली, इंग्लंड, जर्मनी आदी देशांमधील कार्बन डाय आॅक्साईड आणि नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले.

CoronaVirus: 'Corona' crisis shows path to pollution free world; pollution drops by 50% worldwide | CoronaVirus : ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिला प्रदूषणमुक्तीचा मार्ग;जगभरातील प्रदूषण ५० टक्क्यांनी झाले कमी

CoronaVirus : ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिला प्रदूषणमुक्तीचा मार्ग;जगभरातील प्रदूषण ५० टक्क्यांनी झाले कमी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदूषणावर गंभीर विचार करण्याची हीच वेळअमेरिकेत कार्बन उर्त्सजन ४० टक्क्यांनी, तर चीनमध्ये २५ टक्क्यांनी कमी झाले.

- गजानन दिवाण
औरंगाबाद : ‘कोरोना’च्या संकटाने जगभराचा ताप वाढविला असतानाच प्रदूषण कसे रोखता येऊ शकते, याचा मार्गही दाखवून दिला आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरात जगभरातील प्रमुख शहरांमधील प्रदूषण साधारण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण गेल्या २० वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. न्यूयॉर्कमध्ये वाहनांची वर्दळ गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी कमी नोंदविली गेली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले. मार्चमधील वातावरण माझ्या आयुष्यात पाहिलेले सर्वात स्वच्छ वातावरण असल्याचे कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रा. रोईसेन कॉमेन यांनी म्हटले आहे.
चीनमध्ये वीज वापरात तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे. चीन आणि इटलीमध्ये नायट्रोजन डाय आॅक्साईडच्या प्रमाणातही लक्षणीय घट नोंदविली गेली आहे. प्रदूषण निर्मितीत आणि पृथ्वीवरील तापमान वाढविण्यात या वायूचा मोठा वाटा आहे. हवामानात प्रचंड विष सोडणारी शहरे म्हणून ओळख असलेल्या बँकॉक, बीजिंग, बोगोटा आदी ठिकाणचे वातावरण सध्या एकदम स्वच्छ आहे. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये गेल्या महिन्यात प्रदूषणामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. लॉकडाऊनमुळे आता येथील वातावरण एकदम स्वच्छ आहे.

ब्राझीलमधील प्रसिद्ध शहर साओ पाऊलोच्या रस्त्यावर दिवसा हजारो मोटारी दिसायच्या. ट्रॅफिक जाम कायम असायचे. तेवढेच प्रदूषणही व्हायचे. सव्वाकोटी लोकसंख्येचे हे शहर आता लॉकडाऊनमुळे अगदीच छोटे शहर भासत आहे.
कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटामध्ये प्रदूषणाचा प्रश्न इतका भयंकर होता की तिथे अधिकारी अधूनमधून गाड्यांवर बंदी घालत असत. ‘सध्याची स्थिती वातावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करीत आहे,’ ही बोगोटाच्या जिल्हा पर्यावरण सचिव कॅरोलिना यांची प्रतिक्रिया प्रदूषणाची बदलती स्थिती सांगून जाते. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या सॅटेलाईट छायाचित्रांनीदेखील प्रदुषणाचा हा बदल टिपला आहे. ‘कोरोना’च्या संकटातून चीन आता काहीसा सावरत असल्याने प्रदूषण पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, जानेवारीअखेरनंतर चीनमध्ये कोरोनाचे संकट भयावह स्थितीत असताना तेथील प्रदूषण तब्बल २५ टक्क्यांनी कमी झाले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे.

प्रदूषणावर गंभीर विचार करण्याची हीच वेळ
प्रदूषणामध्ये वाहनांचा वाटा किती मोठा, हे ‘कोरोना’च्या संकटाने जगभराला दाखवून दिले आहे. कोरोनाचे संकट मोठे आहेच; पण याच संकटाने आपल्याला ताजी हवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रदूषणावर शांतपणे आणि तेवढेच गंभीरपणे विचार करण्याची हीच वेळ असल्याचे ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड सायन्सच्या संचालक सुनीता नारायण यांनी स्पष्ट केले.

Web Title: CoronaVirus: 'Corona' crisis shows path to pollution free world; pollution drops by 50% worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.