विकासकामे 'फास्ट ट्रॅक'वर; औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवेचा प्राधान्याने विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 11:47 AM2021-09-10T11:47:38+5:302021-09-10T11:50:22+5:30

गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे.

Development work on 'fast track'; Aurangabad to Shirdi airline priority | विकासकामे 'फास्ट ट्रॅक'वर; औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवेचा प्राधान्याने विचार

विकासकामे 'फास्ट ट्रॅक'वर; औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवेचा प्राधान्याने विचार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा विकास आढावा बैठकीसाठी भाजप आमदाराला निमंत्रणच आले नव्हते.

औरंगाबाद : औरंगाबाद ते शिर्डी या मार्गावर विमानसेवा सुरू झाल्यास पर्यटकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असून, ही सेवा देण्यासाठी प्राधान्याने विचार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हा विकासकामांच्या सादरीकरण आणि आढावा बैठकीत केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांना ‘फास्ट ट्रॅकवर’ पूर्ण करण्याचे आदेश दिले.

समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे ११२.४० किलोमीटरचे काम पूर्ण होत आहे. औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडण्याच्या पर्यायाचा विचार करण्याची माहिती मुख्यमंत्र्यांना बैठकीत स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर त्यांनी या प्रस्तावाचा प्राधान्याने विचार करण्याची सूचना केली. निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीला निधी देणे, शहरांतील रस्ते व सातारा-देवळाईत भूमिगत गटार योजनेसाठी ६९९ कोटींच्या निधीसाठी नगरोत्थान योजनेतून प्रयत्न करणे, तसेच पैठणचे संतपीठ लवकर सुरू करणे, औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाला चालना देण्यासह गुंठेवारी वसाहती नियमितीकरण, सफारी पार्क, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन, घृष्णेश्वर मंदिर विकास व इतर विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह सर्व विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय, आदी अधिकारी उपस्थित होते.

नगरोत्थानमधून ६९९ कोटी मिळण्याची शक्यता
मनपा प्रशासक पांडेय यांनी सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनिस्सारणसाठी ३८२ कोटी रुपये आणि शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी ही कामे तातडीने नगरविकास विभागास महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

संतपीठ हे विद्यापीठ व्हावे
पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत तसेच वसतिगृह तयार आहे. अद्याप प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू झालेला नाही. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या संत साहित्याच्या अभ्यासकांना बोलवावे. ट्रस्टची पुनर्रचना करावी. संतपीठ विद्यापीठ होण्यासाठी यूजीसीकडे पाठपुरावा करावा.

निजामकालीन शाळांचे रूप बदलणार
जि. प.च्या अखत्यारितील १४४ शाळांच्या इमारती निजामकालीन असून, त्यातील बहुतांश मोडकळीस आलेल्या आहेत. या शाळांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती हाती घ्यावी.

गुंठेवारीची प्रकरणे वेगाने सोडवा
गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे.

सफारी पार्क-
सफारी पार्कमध्ये प्राणी उद्यान व सफारीसाठी जमिनीची मागणी मनपाने केली आहे. वन विभागाच्या समन्वयाने ही कार्यवाही करण्यात येईल.
औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्ग- सध्या औरंगाबाद-मनमाड-अहमदनगर असे २६५ किलोमीटरचे रेल्वेचे अंतर आहे. याला पर्याय म्हणून औरंगाबाद ते अहमदनगर असा ११२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.

घृष्णेश्वर मंदिर विकास, सिथेंटिक ट्रॅकसाठी ग्रीन सिग्नल-
घृष्णेश्वर मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम, विभागीय क्रीडा संकुलातील सिथेंटिक ट्रॅक करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

भाजपच्या आमदारांना निमंत्रणच नाही
जिल्हा विकास आढावा बैठकीसाठी भाजप आमदाराला निमंत्रणच आले नव्हते. त्यामुळे ते बैठकीला गेले नाहीत. आ. अतुल सावे यांनी सांगितले, विकासकामांच्या बैठकीसाठी सीएमओ कार्यालयातून निमंत्रण नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या फोनवरून आम्ही बैठकीला कसे जाणार. जिल्ह्यातील एकही आमदार या बैठकीसाठी त्यामुळेच गेला नाही. सीएमओ कार्यायाकडून निमंत्रण मिळणे गरजेचे होते. शेवटी जिल्हा आणि शहरातील विकासकामांत भाजपचे मोठे योगदान आहे.

Web Title: Development work on 'fast track'; Aurangabad to Shirdi airline priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.