फसवणुकीची साखळी : शेती, पोल्ट्रीच्या नावावर नोंदणी, धंदा शेअर मार्केटचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 01:28 PM2021-11-21T13:28:10+5:302021-11-21T13:28:38+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : दामदुप्पट परतावा देणारी कंपनी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या एका कंपनीची नोंदणी शेती, फलोद्यान ...

Agriculture, registration in the name of poultry, business of stock market | फसवणुकीची साखळी : शेती, पोल्ट्रीच्या नावावर नोंदणी, धंदा शेअर मार्केटचा

फसवणुकीची साखळी : शेती, पोल्ट्रीच्या नावावर नोंदणी, धंदा शेअर मार्केटचा

Next

विश्वास पाटील
कोल्हापूर : दामदुप्पट परतावा देणारी कंपनी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या एका कंपनीची नोंदणी शेती, फलोद्यान व पोल्ट्रीला लागणारे साहित्य पुरवणी कंपनी म्हणून झाली आहे. त्या नावे कंपनीचा जीएसटी नंबर आहे. रिटेल, होलसेल बिझनेस असे कंपनी स्वत:च्या वेबसाईटवर म्हणते. मग त्यांनी शेतीतून असे कोणते उत्पादन घेतले की त्यातून ते लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा मोबदला दुप्पट देत आहेत याची विचारणा ज्यांनी त्यामध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांनीच करण्याची गरज आहे.

ज्या कंपनीची नोंदणीच कृषीपूरक व्यवहार करण्यासाठी झाली आहे, ती शेअर्समध्ये कशी गुंतवणूक करू शकेल, ते कायदेशीर आहे का याचा विचार गुंतवणूकदार करायला तयार नाही. किंबहुना आजच्या घडीला तो कशाचाच विचार करायला तयार नाही. अमक्याला एवढे लाख मिळाले, गाडी मिळाली मीच मागे राहिलोय असे वाटून तो स्वत: गुंतवणूक करण्यासाठी आणि इतरांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे. या कंपनीने शेवटचे रिटर्न्स जानेवारी २०२१ मध्ये भरले आहे. त्यानंतर आता दहा महिने झाले तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. सहा महिने रिटर्न्स भरले नसल्यास नोंदणी रद्द होवू शकते असा कायदा आहे व प्रत्यक्षातही तसे घडते. कंपनीची नोंदणी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी) नुसार झाली आहे. ही कंपनी पैसे भरून घेतल्यावर तसे एक साधे पत्र गुंतवणूकदारास देते. त्यास कायदेशीर काहीच अर्थ नाही.

तेवढ्या एका प्रमाणपत्रावर लोक कोट्यवधी रुपये गुंतवत आहेत. त्यामुळे उद्या पैसे मिळेनात म्हणून तुम्ही कोणत्याही यंत्रणेकडे दाद मागायला गेला तरी तुम्हाला तेथून हाकलून देतील. कारण या प्रमाणपत्राला कायदेशीर पुरावा म्हणून शून्य किंमत आहे. तुमच्याकडून पार्टनर म्हणून रक्कम घेतली जात असेल तर कायद्याने पार्टनरशिप करार करणे बंधनकारक असते.

बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल..

ज्या लोकांनी विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी त्या कंपन्यांच्या व्यवहाराचे स्वरुप तपासावे. त्यातील पारदर्शकता जोखावी. तुमच्या कष्टाच्या लाख रुपयाचे दामदुप्पट करून देणारी कंपनी हे पैसे मिळवते कोठून हे तरी एकदा कंपनीच्या संचालकांना किंवा गुंतवणूक करा म्हणून आग्रह धरणाऱ्यास विचारले पाहिजे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा व्यवहार झाल्यास यातील बिंग बाहेर पडू शकेल..

व्यापक सामाजिक हित

- लोकमत गेली पाच दिवस वृत्तमालिकेच्या माध्यमातून या फसवणुकीचा भांडाफोड करत आहे, त्यामागे व्यापक सामाजिक हित आहे. कोणतरी सोम्या-गोम्या उठतो आणि तुम्हाला अमूक वर्षात एवढा फायदा करून देतो असे आश्वासन देतो आणि आपल्या समाजातील जे स्वत:ला सुशिक्षित समजतात असे शिक्षक, डॉक्टरपासून, सरकारी नोकरापर्यंत कोणतीही खातरजमा न करता कोट्यवधी रुपये गुंतवतात.
-त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे हे काम आहे. या कंपन्या कोण आहेत, ते कोण चालवतात त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. जे गुंतवणूक करतात त्यांची फसवणूक होऊ नये, कुणाला तरी आयुष्यातून उठायला लागू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे.

कसबा वाळवेत पैसे मागण्यासाठी तगादा

दामदुप्पट योजनेत फसवणूक होऊ शकते हे लक्षात आल्यावर आता गुंतवणूकदार ज्यांच्याकडे पैसे गुंतविले होते, त्यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत आहेत. राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीने वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली कंपनी स्थापन करून कसबा वाळवेतून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले. इतर कंपन्या दामदुप्पट देत असताना हा दामतिप्पट देतो अशी हमी देत होता. त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी दोन दिवसांपूर्वी त्याला गावात बोलवून घेतले व मुद्दल परत करण्याची मागणी केली. त्यांनी ५० लाखांपर्यंतची रक्कम परत केली असल्याची माहिती स्थानिक लोकांनी शनिवारी दिली. तुमच्या गावांतील अमूक इतके कोटी रुपये गुंतवणूक झाली असल्याने सर्वांचे पैसे परत करतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

गावातील ग्रुपवर चर्चा

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या प्रत्येक गावाच्या ग्रुपवर शेअर होत आहेत. कष्टाला मरण नाही.. फसव्या योजनांना बळी पडू नका, असे प्रबोधन लोक करीत आहेत.

Web Title: Agriculture, registration in the name of poultry, business of stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.