"इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी” भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 07:22 PM2021-11-18T19:22:26+5:302021-11-18T19:22:47+5:30

​या परिषदेस केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असताना सुद्धा आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

BJP Atul Bhatkhalkar criticizes Aditya Thackeray over visit to Scotland | "इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी” भाजपाची टीका

"इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी” भाजपाची टीका

Next

मुंबई-​स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (सिओपी-२६) कोणतेही अधिकृत निमंत्रण नसताना सुद्धा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे, त्यामुळे “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

​या परिषदेस केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असताना सुद्धा आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय? पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? या सर्व प्रश्नांची आता मुख्यमंत्र्यांनीच उत्तरे द्यावी व या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी केली आहे.

​मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायू प्रदूषणाचा विळखा पडलेला असताना व अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली.

Web Title: BJP Atul Bhatkhalkar criticizes Aditya Thackeray over visit to Scotland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.