डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 07:03 AM2021-09-29T07:03:37+5:302021-09-29T07:05:23+5:30

मुंबईतील मुलुंडमधील घटना

Death of a pregnant woman with child due to no doctors available mumbai pdc | डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी

डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील मुलुंडमधील घटना, अधिक चौकशी सुरू केल्याची माहिती.

मुंबई : डॉक्टरांअभावी पालिकेच्या प्रसूतिगृहात आठ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मंगळवाऱी मुलुंडमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या उपचारासाठी वणवण करणाऱ्या कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात देतानाही अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांंनी केला आहे.

मुलुंडच्या डम्पिंग रोड परिसरात निशा कसबे या कुटुंबीयासोबत राहत होत्या. सोमवारी (दि. २७)  त्यांना त्रास होऊ लागल्याने मुलुंड पश्चिमेकडील पालिकेच्या प्रसूतिगृहात दाखल केले. रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघड़ली. मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. अखेर दोन वाजता येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांंना याची माहिती देत, निशा यांना सावरकर रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

पती नितीन कसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या प्रसूतिगृहामध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत. यामुळे निशा आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे, विच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यासाठी शववाहिनी मिळविण्यासाठी सकाळ उजाडली. सकाळी नऊ वाजता शववाहिनी मिळताच मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेला आहे. 

निशाच्या मृत्यूमुळे कुटुंबिय मानसिक धक्क्यात असताना, पोलिसांनी पोलीस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधी साडेचार हजार नंतर अडीच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप कसबे कुटुंबियानी केला आहे. अंमलदाराच्या मोबाइल वरून एक पोलीस अधिकारी पैशांची मागणी करत असल्याचे निशाच्या पतीचे म्हणणे आहे. फोटो कॉपीसाठी पैसे खर्च करावे लागत असल्याचे सांगत पैशांची मागणी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

कर्मचारी म्हणे, चारनंतर डॉक्टर येत नाहीत 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मिहिर कोटेजा यांनी रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा, चारनंतर रुग्णालयात डॉक्टर येत नसल्याचे तेथील नर्सकड़ून समजले. या प्रकरणी पालिकेसह पोलिसांकड़े तक्रार देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक चौकशी सुरू - अल्ले
टी वॉर्डचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्याकडे विचारणा करताच याबाबत माहिती मागवली असून, अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Death of a pregnant woman with child due to no doctors available mumbai pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.