Tokyo Olympics: शानदार, जबरदस्त! गतविजेत्या अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:55 AM2021-07-29T08:55:27+5:302021-07-29T08:57:40+5:30

Tokyo Olympics Live Updates, Indian Hockey Team: आज झालेल्या लढतीत भारताने रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य अर्जेंटिनावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Tokyo Olympics: India beat Argentina 3-1 in men's hockey Pool A match | Tokyo Olympics: शानदार, जबरदस्त! गतविजेत्या अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

Tokyo Olympics: शानदार, जबरदस्त! गतविजेत्या अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

Next

टोकियो - भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी सुरू ठेवली आहे. आज झालेल्या लढतीत भारताने रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य अर्जेंटिनावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताने (Hockey India) या लढतीत अर्जेंटिनाचे आव्हान ३-१ अशा फरकाने परतवून लावले आहे. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या चार सामन्यांमधील भारताचा हा तिसरा विजय आहे. भारताने न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटिना या संघांवर विजय मिळवला आहे. तर केवळ ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात ३० जुलै रोजी भारत यजमान जपानविरोधात खेळणार आहे. (India beat Argentina 3-1 in men's hockey Pool A match)

आज झालेल्या लढतीत बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध भारताने जोरदार खेळ केला. सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांना गोल करता न आल्याने मध्यांतराला गोलफलक ०-० असा बरोबरीत होता. दरम्यान, तिसरा क्वार्टर संपण्यापूर्वी ४३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरच्या पुरेपूर फायदा उठवत भारताच्या वरुण कुमारने गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र भारताची ही आघाडी फार काळ टिकली नाही. ४८ व्या मिनिटाला मॅको स्कूथ याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अर्जेंटिनाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर अखेरच्या दहा मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी जोरदार आक्रमण केले. त्यात ५८ व्या मिनिटाला विवेक सागरने सुरेख मैदानी गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर पुढच्याच ५९ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करत भारताचा विजय निश्चित केला. 

तिसऱ्या विजयासह भारतीय संघाने अ गटामध्ये ९ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया सर्वच्या सर्व ४ सामने जिंकून १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. स्पेन न्यूझीलंड आणि अर्जेंटिनाच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. मात्र गोल सरासरीच्या जोरावर स्पेनने तिसरे, न्यूझीलंडने चौथे आणि अर्जेंटिना पाचव्या स्थानावर आहे. यजमान जपान ४ सामन्यांतून एक गुणासह अखेरच्या स्थानावर आहे.   

Web Title: Tokyo Olympics: India beat Argentina 3-1 in men's hockey Pool A match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.