फ्रान्समध्ये दर चौघांमधला एक ‘बहिरा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:10 AM2022-06-25T06:10:29+5:302022-06-25T06:10:47+5:30

International: मोबाइल आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे, कोणालाही तो त्यांच्या आयुष्यातून काढून घेता येणार नाही पण मोबाइलबरोबरच इअरफोन्स आणि हेडफोन्सही अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. इअरफोन्स, हेडफोन्स कानाला लावून रस्त्यावर सर्रास फिरताना अनेकजण आपल्याला दिसतात.

One in four deaf people in France! | फ्रान्समध्ये दर चौघांमधला एक ‘बहिरा’!

फ्रान्समध्ये दर चौघांमधला एक ‘बहिरा’!

Next

मोबाइल आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे, कोणालाही तो त्यांच्या आयुष्यातून काढून घेता येणार नाही पण मोबाइलबरोबरच इअरफोन्स आणि हेडफोन्सही अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. इअरफोन्स, हेडफोन्स कानाला लावून रस्त्यावर सर्रास फिरताना अनेकजण आपल्याला दिसतात. मोबाइल वापराचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. इअरफोन आणि हेडफोन्सच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. हेडफोन आणि इअरफोनमधून येणारा तीव्र आवाज कानाच्या पडद्यांवर मोठ्याने आदळतो आणि त्यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होते, हे संशोधकांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे; पण आजवर कोणीही, विशेषत: तरुणांनी ते फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाही. 
या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये आजवरचा आणि जगातलाही सर्वात मोठा म्हणता येईल, असा सर्व्हे नुकताच घेण्यात आला. १८ ते ७५ वर्षे वयोगटातील तब्बल दोन लाख लोकांचा यात समावेश होता. या अभ्यासाचे निष्कर्ष केवळ फ्रान्सलाच नव्हे, तर अख्ख्या जगाला हादरवून टाकणारे आहेत. या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, फ्रान्समध्ये चारापैकी एकजण ‘बहिरा’ आहे किंवा त्याला कमी ऐकायला येतं. सर्वसाधारणपणे देशातील २५ टक्के लोकांना जर ऐकण्याचा त्रास असेल, त्यांना क्षमतेपेक्षा कमी ऐकू येत असेल, तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे, असं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अर्थात लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झाली यामागे अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सर्वांत मोठा वाटा हेडफोन्स आणि इअरफोन्सचा आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. 
लोकांची लाइफस्टाइल बदलली आहे, ते एकटे पडले आहेत, लोकांशी प्रत्यक्ष संपर्क कमी झाला आहे, त्यामुळे अनेकजण नैराश्याचे शिकार झाले आहेत आणि त्यात इअरफोन्सच्या अतिरेकानं ऐकण्याची क्षमता कमी झाल्यानं त्यांच्या त्रासात आणखी भरच पडली आहे. 
फ्रान्समध्ये साधारणपणे फक्त ४० टक्के लोक इअरफोन्स वापरतात. तरीही त्यांच्याकडे कमी ऐकू येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, याची इतरही अनेक कारणं आहेत. लाइफस्टाइल हे सर्वात मोठं कारण आहे. जे लोक इअरफोन्स वापरतात, त्यांच्यापैकी जवळपास नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची ऐकू येण्याची क्षमता कमी झाली आहे, असं म्हटलं जातंय. फ्रान्स सरकारनं ही बाब आता अतिशय गांभीर्यानं घेतली असून, लोकांची लाइफस्टाइल आरोग्यदायी व्हावी, इअरफोन्ससारख्या उपकरणांचा वापर कमी व्हावा, याबाबत ते जनजागृती करणार आहेत. 
फ्रान्समध्ये ही समस्या वाढली, याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक सार्वजनिक ठिकाणी लोकांना मोफत इअरफोन्स वाटले जातात. आश्चर्याची गोष्टी म्हणजे त्यात सरकारचाही वाटा अधिक आहे. सरकारच्या आरोग्य खात्यानंच लोकांना मोफत इअरफोन्स वाटल्यानं लोकांनी आता सरकारलाही धारेवर धरलं आहे. 
कोणताही आवाज ऐकण्याची आपल्या कानांची क्षमता ९० डेसिबलपर्यंत असते; पण सतत आणि अगदी जवळून काही आवाज तुमच्या कानावर आदळत राहिले, तर आपली ऐकण्याची क्षमता कमी कमी होत ४०-५० डेसिबलपर्यंत जाते आणि नंतर जवळपास बहिरेपणाच येतो. आपले कान बधिर होतात. 
सतत तीव्र आवाज कानांवर पडले तर आपल्याला हृदयविकार होऊ शकतो, एवढंच नाही, कॅन्सरसारख्या आजारांनाही  सामोरं जावं लागू शकतं. इअरफोनवर तासनतास गाणी ऐकणं, वेगवेगळे कार्यक्रम पाहणं, ऐकणं भलेही अनेकांना सोयीचं, मजेचं वाटत असेल; पण हीच मजा नंतर सजा होऊ शकते. यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं, मेंदूला इजा पोहोचू शकते, म्युझिकचे व्हायब्रेशन्स सतत कानांवर आदळल्यानं मानसिक आजारांना ते आमंत्रण ठरू शकतं, इतकंच नाही, त्यामुळे डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि निद्रानाशाचाही विकार जडू शकतो.

आणखी २५ वर्षांत दीड कोटी बहिरे!
यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनंही धोक्याचा 
इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणते, आणखी केवळ २५ वर्षांत जगात बहिऱ्यांची संख्या दीड कोटी इतकी प्रचंड असेल. तुम्हाला ऐकू येतंय ना? नीट लक्ष द्या.. या दीड कोटींमध्ये आपण असणार नाहीत, याची काळजी घ्या..!

Web Title: One in four deaf people in France!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.