प्रार्थना करणार सामाजिक चित्रपट
By Admin | Published: February 26, 2017 02:54 AM2017-02-26T02:54:30+5:302017-02-26T02:54:30+5:30
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहमीच प्रेमकथा, कौटुंबिक आणि कॉमेडी चित्रपटात दिसली. आता मात्र ती अभिनयाची चौकट मोडत एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहमीच प्रेमकथा, कौटुंबिक आणि कॉमेडी चित्रपटात दिसली. आता मात्र ती अभिनयाची चौकट मोडत एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ती आता लवकरच एका सामाजिक चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती एका सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या हटके भूमिकेविषयी प्रार्थना बेहेरे लोकमत सीएनएक्सला सांगते, आतापर्यंत मी अनेक प्रेमकथा केल्या आहेत. त्याचबरोबर या सर्व चित्रपटांमध्ये मी ग्लॅमरस लूकमध्ये दिसले. आता मात्र एका सर्वसामान्य अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मी दिसणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा असे काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली म्हणून खूपच आनंद झाला. कादिर शेख दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदी नाटके केली आहेत. आमचा हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित आहे. अशा या चित्रपटातून समाजापर्यंत एक चांगला संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे. देशाचे भविष्य म्हणून तरुणांकडे पाहिले जाते. अशा या तरुणाईला समोर ठेवूनच हा चित्रपट दिग्दर्शित करण्यात आला आहे. या सामाजिक चित्रपटाचा भाग मला होता आले यासारखी महत्त्वाची गोष्ट नाही. तसेच या चित्रपटात मला वेगळ्या भूमिकेत पाहून, माझे चाहतेदेखील नक्कीच खूश होतील असे वाटते. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. तसेच काही चित्रीकरण नुकतेच जत येथे पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रपटात माझ्यासोबत अभिनेता भूषण प्रधान झळकणार आहे. आमच्या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे आमची ही हटके जोडी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. प्रार्थना बेहेरेच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्यापदेखील गुलदस्त्यात आहे.