नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ... 

By किरण अग्रवाल | Published: October 7, 2021 05:38 PM2021-10-07T17:38:07+5:302021-10-07T17:38:22+5:30

Addiction of Social Media : म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे.

Underlining the need for a new addiction ... | नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ... 

नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ... 

Next

- किरण अग्रवाल
 
काळाच्या ओघात जीवनमान बदलले तशा गरजा बदलल्या व त्या अनुषंगाने साधन सुविधाही उपलब्ध झाल्या. ही साधने व सुविधा जीवन सुसह्य करण्यासाठीच असल्याने त्यावरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत जाणे स्वाभाविकच होते, परंतु त्याखेरीज आपण त्याच्या आहारी जाऊ लागल्याने ते सारे गरजेचे व सवयीचे होत गेले. अशी सवय जेव्हा अतिरेकाची पातळी गाठते तेव्हा ती व्यसनाधीनता म्हणवते. संपर्क सुविधेचे साधन म्हणून आलेल्या मोबाईलचा वापर व त्यावरील सोशल मीडियाची हाताळणी हीदेखील आजच्या आधुनिक काळातील व्यसनाधीनताच बनली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. 

व्यसन म्हटले की प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात त्या विडी, सिगारेट, तंबाखू, मद्य आदि बाबी; अलीकडे त्यात गुटक्याचीही भर पडली आहे. आता या यादीत मोबाईलचाही समावेश करता येणार आहे, कारण साधन म्हणून तातडीच्या व सुलभ संपर्कासाठी मोबाईलचा वापर गरजेचा बनला असला तरी त्यावरील सोशल मीडियाच्या नादात विशेषता तरुणवर्ग इतका नादावला आहे की त्यातून त्याची स्वमग्नता ओढवते आहे. म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी व त्यातून नाते संबंध दृढ करण्याऐवजी चॅटिंगच्या माध्यमातून संबंध टीकवण्याकडे कल वाढला आहे. दसरा, दिवाळीला घरोघरी जाऊन होणाऱ्या स्नेहाच्या भेटी आता व्हाट्सअपवर संदेशांचे आदान-प्रदान करून होतात. दुःखद प्रसंगी रडक्या ईमोजीने काम भागू लागले आहे. स्नेह टिकतोय, पण ओलावा ओसरतोय; असेच याबाबत म्हणता यावे. 

महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलचा वापर करताना त्यावरील व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियावर रमण्याचे वा त्यातच गुंतून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या गोष्टीचे व्यसन जडावे तसा हा प्रकार झाला आहे. अलीकडेच व्हाट्सअप, फेसबुक 5/6 तासांसाठी बंद पडल्यावर अनेक जणांना जो अस्वस्थतेचा अनुभव आला त्यातून यासंबंधीची व्यसनाधीनता अधोरेखित होऊन गेली. घराघरात टीव्हीसमोर बसून राहणाऱ्या व मोबाईलमध्ये डोके घालून बसणाऱ्या लहान मुलांना पालकांकडून दटावले जाते, परंतु मोबाईलवरील सोशल मीडियात गुंतून पडलेल्या पालकांचा कान धरणार कोण असा प्रश्न आहे. कामाचा अगर उपयोगीतेचा भाग म्हणूनच नव्हे, तर  बिनकामानेही, टाईमपास म्हणून ही माध्यमे हाताळणे अनेकांना इतके अंगवळणी पडून गेले आहे, की ते सुरू नसले की चुकचुकल्यासारखे होते. हे जे सवयीचे होऊन गेले आहे ती सवयीची गुलामगिरी घातक आहे, हा यातील चिंतेचा विषय आहे. सोशल मीडियाच्या हाताळणीची आधुनिक व्यसनाधीनता यातून पुढे आली असून, पारंपरिकतेखेरीजची ही नवी व्यसनमुक्ती साधणे आता गरजेचे होऊन गेले आहे.

Web Title: Underlining the need for a new addiction ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.