‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 09:43 AM2018-08-17T09:43:58+5:302018-08-18T06:00:00+5:30

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

'Take Care Good Night' movie trailer displayed | ‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची आहे‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.  

या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर  गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना  या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडिलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.  

लेखक गिरीश जोशी म्हणतात की, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी  घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले,” ते म्हणतात.  

जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.”

या चित्रपटाची प्रस्तुती करत असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो,हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई – २, बापजन्म आणि आम्ही दोघी या काही चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती कंपनीने केली आहे. 
 

Web Title: 'Take Care Good Night' movie trailer displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.