‘कही खुशी, कही गम’, तरी दाखविणार ‘तीन’मध्ये ‘दम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 07:00 AM2021-09-23T07:00:00+5:302021-09-23T07:00:07+5:30

Nagpur News तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आपल्यालाच फायदा होईल, असा दावा मोठ्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

‘Kahi Khushi, Kahi Gham’, but will show ‘Dum’ in ‘Teen’ | ‘कही खुशी, कही गम’, तरी दाखविणार ‘तीन’मध्ये ‘दम’

‘कही खुशी, कही गम’, तरी दाखविणार ‘तीन’मध्ये ‘दम’

Next
ठळक मुद्देमोठ्या पक्षांचा दावा, मनपा आमचीच नवी प्रभागरचना कुणाच्या फायद्याची ?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्वच राजकीय पक्षांकडून नियोजनाचे नवीन गणित आखणे सुरू झाले. काही पक्षांचे निवडणूक सूत्रच बिघडले असले तरी या तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आपल्यालाच फायदा होईल, असा दावा मोठ्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने ही प्रभागरचना आपल्याच फायद्याची असल्याची भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने मात्र नवीन प्रभाग रचनेमुळे काहीच फरक पडत नसल्याचे म्हणत चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागामुळे परत सत्तेवर येऊ असाच दावा केला आहे. शहरात अस्तित्वासाठी अद्यापही संघर्ष करणाऱ्या मनसेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्रिसदस्यीय पद्धतीमुळे तीन नगरसेवकांच्या दारात पायपीट करावी लागणार असल्याने जनतेचे नुकसान होणार असल्याची भूमिका पक्षाने मांडली आहे.

 

तीन सदस्यीय रचनेचा काँग्रेसला फायदाच

२००२ साली मी महापौर झालो असताना शहरात तीन सदस्यीय प्रभाग रचनाच होती. काँग्रेसला सत्तेवर येऊ द्यायचे नाही यासाठी भाजपने प्रभागाचे तुकडे करत चार सदस्यीय रचना आणली होती. नवीन प्रभाग रचनेचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. १५ वर्षांतील धूळफेक जनतेच्या लक्षात आली असून मतदार जागरुक झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत काँग्रेसचेच पारडे जड असेल.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस

 

वॉर्डाच्या संख्येने फरक नाही

ज्यांना निवडणुकीत पडण्याची भीती वाटते त्यांनी १, २, ३ किंवा ४ प्रभाग तयार करावेत. भाजपला कशाचाही फरक पडत नाही. आमच्याकडे व्हिजनरी नेत्यांसोबतच लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आहे. महाविकास आघाडीतील पक्ष संकुचित मानसिकतेचे असून लोकांना संभ्रमित करण्यासाठी प्रभाग रचना बदलण्याची चाल खेळली जात आहे.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

 

राष्ट्रवादीला फायदा मिळणार

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक करण्याचा निर्णय जनहित लक्षात ठेवून घेतला आहे. राष्ट्रवादीने मनपा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे. या निर्णयामुळे पक्षाला फायदाच होणार आहे. आम्ही काँग्रेस व सेनेसह मिळून निवडणूक लढू इच्छितो. जर नागपुरात महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर निवडणुकीसाठी देखील पक्ष तयार आहे.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

 

शिवसेनेसाठी चांगली संधी

मनपा निवडणुकीसाठी शिवसेना यंदा नव्या उर्जेने उतरणार आहे. शहरात तीन सदस्यीय प्रभागरचना असल्याने शिवसेनेसाठी चांगली संधी राहणार आहे. बहुतांश ठिकाणी भाजप नगरसेवकांनी कामच केलेले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता खूष आहे. शिवाय शहरात संघटन बळकटीवर आम्ही भर दिला आहे. त्यामुळे यावेळी चित्र बदललेले दिसेल.

- नितीन तिवारी, शहरप्रमुख, शिवसेना

 

निर्णय चुकीचा, आमच्या नियोजनाला धक्का नाही

मुळात राज्य शासनाने परत बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा निर्णय घेऊन घोडचूक केली आहे. यामुळे प्रभागांमध्ये समस्या वाढतात व जबाबदारी कुणा एका नगरसेवकावर निश्चित करता येत नाही. एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम करण्यात येते. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरू. या रचनेमुळे आमचे नुकसान होणार नाही हे निश्चित.

- हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस, मनसे

Web Title: ‘Kahi Khushi, Kahi Gham’, but will show ‘Dum’ in ‘Teen’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.