Olympics: फ्लॅश बॅक: सुवर्णमय भारत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:50 AM2021-08-04T06:50:09+5:302021-08-04T06:50:48+5:30

Indian Hockey: भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांनी ऐतिहासिक कामगिरी करताना  ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यानंतर चर्चा सुरु झाली ती १९८० साली झालेल्या मॉस्को  ऑलिम्पिकची.

Olympics: Flashback: Golden India! | Olympics: फ्लॅश बॅक: सुवर्णमय भारत!

Olympics: फ्लॅश बॅक: सुवर्णमय भारत!

Next

भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांनी ऐतिहासिक कामगिरी करताना  ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यानंतर चर्चा सुरु झाली ती १९८० साली झालेल्या मॉस्को  ऑलिम्पिकची. कारण, या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने सुवर्ण, तर महिला संघाने चौथे स्थान पटकावले होते. ही आतापर्यंतची भारताची अखेरची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्यामुळेच, मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धा नेमकी कशाप्रकारे झाली होती, याचा घेतलेला हा आढावा...
यजमानांचा जलवा
मॉस्को  ऑलिम्पिकमध्ये यजमान सोवियत संघाचे ८० सुवर्ण पदकांसह वर्चस्व राहिले. त्यांनी ६९ रौप्य व ४६ कांस्य पदकांसह सर्वाधिक १९५ पदके पटकावली. पूर्व जर्मनीने १२६ पदकांसह द्वितीय, तर बल्गेरियाने ४१ पदकांसह तिसरे स्थान पटकावले होते. भारताने एका सुवर्ण पदकासह २३ वे स्थान मिळवले होते.
ऑलिम्पिकवर झाला होता बहिष्कार
अफगानिस्तानमध्ये सोवियत संघांच्या फौजा तैनात झाल्या होत्या. याचा विरोध करताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या आग्रहानंतर संयुक्त राज्य अमेरिकाच्या नेतृत्त्वात तब्बल ६५ देशांनी मॉस्को  ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. काही देशांच्या खेळाडूंनी  ऑलिम्पिक ध्वज अंतर्गत स्पर्धेत भाग घेतला होता. 
या देशांनी घातला बहिष्कार
अमेरिका, पश्चिम जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांनी मॉस्को ऑलिम्पिकवर टाकलेला बहिष्कार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निर्णयावर अमेरिकेतही विरोध झाला होता.
स्वप्नवत अंतिम सामना
अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने सुरिंदर सिंग सोढीच्या जोरावर मध्यंतराला  २-० अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सत्रात  स्पेनने २-२ अशी बरोबरी साधली एम. के. कौशिकने भारताला आघाडीवर नेले, मात्र ही आघाडी फार वेळ न टिकल्याने पुन्हा एकदा सामना ३-३ असा बरोबरीत आला. अखेर मोहम्मद शाहिदने केलेल्या  गोलच्या जोरावर भारताने ४-३ अशा विजयासह सुवर्णपदकावर कब्जा केला.

यजमान शहर : मॉस्को (सोवियत संघ)
n सहभागी खेळाडू : ५,१७९ (४,०६४ पुरुष आणि १,११५ महिला)
n एकूण स्पर्धा : २१ खेळांतील २०३ स्पर्धा
n उदघाटन : १९ जुलै १९८०
n समारोप : ३ ऑगस्ट १९८०
n अधिकृत उदघाटक : सोवियत संघाचे अध्यक्ष लिओनीद ब्रझनेव
n स्टेडियम : सेंट्रल लेनिन स्टेडियममधील ग्रँड एरेना
स्पर्धांचे आयोजन मॉस्कोमधील दोन वेगवेगळ्या स्टेडियम्समध्ये करण्यात आले होते. यामध्ये डायनामो स्टेडियममधील मायनर एरेना आणि यंग पायोनियर स्टेडियम यांचा समावेश आहे. 

महिला हॉकी संघाचा प्रवास
रूपा सैनी, कृष्णा सैनी, स्वर्णा सैनी, लॉरेन फर्नांडिस आणि प्रेम माया सोनेर यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी भारताला अखेरच्या चार संघांमध्ये प्रवेश करुन देण्यात मोलाची कामगिरी केली. ऑस्ट्रियाला २-० असे नमवल्यानंतर पोलंडला ४-० असा धक्का दिला. चेकोस्लाव्हाकियाविरुद्ध १-२ असा पराभव झाल्यानंतर  झिम्बाब्वेविरुद्ध १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले.  

भारतीय पुरुष हॉकीचा प्रवास
भारतीय हॉकी संघाने टांझानियाला १८-० असे लोळवले. ऑलिम्पिकमधील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यानंतर भारतीयांनी क्यूबाला १३-० असे नमवले. भारताची खरी परीक्षा पोलंडविरुद्ध झाली आणि हा सामना २-२ असा बरोबरी सुटला. पुढील स्पेनविरुद्धचा सामनाही बरोबरीत सुटला. भारताने गटात दुसरे स्थान मिळवले, तर स्पेनने अव्वल स्थान. 

Web Title: Olympics: Flashback: Golden India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.