... अन् आनंद दिघेंनी रागातच तहसिल ऑफिस गाठलं, निवृत्त क्लर्कने सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:18 PM2022-05-11T20:18:40+5:302022-05-11T20:23:20+5:30

दिपक नलावडे हे सध्या मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अनेक मराठी नाटकांचे निर्माता आणि चित्रपटांचे सहनिर्माते बनून ते काम करतात

... Anand Dighe reached the tehsil office in anger, the retired clerk said about memories of anand dighe | ... अन् आनंद दिघेंनी रागातच तहसिल ऑफिस गाठलं, निवृत्त क्लर्कने सांगितली आठवण

... अन् आनंद दिघेंनी रागातच तहसिल ऑफिस गाठलं, निवृत्त क्लर्कने सांगितली आठवण

googlenewsNext

मुंबई/ठाणे - कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या ट्रेलरचा लाँचिंग सोहळा नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याहस्ते पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडचा दंबग सलमान खान हाही उपस्थित होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमान रील लाईफमधील दबंग आहे, तर दिघे रिअल लाईफमधील दबंग होते, अशी त्यांच्या शैलीत दाद दिली. यावेळी आनंद दिघेंच्या आठवणीही जागवल्या. या चित्रपटामुळे अनेकजण त्यांच्या आठवणी जागवत आहेत. ठाण्यातील तहसिल कार्यालयात क्लर्क म्हणून काम केलेल्या दिपक नलावडे यांनीही आनंद दिघेंच्या आठवणी फेसबुकवरुन शेअर केल्या आहेत. 

दिपक नलावडे हे सध्या मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अनेक मराठी नाटकांचे निर्माता आणि चित्रपटांचे सहनिर्माते बनून ते काम करतात. काही वर्षांपूर्वी ते नायब तहसिलदार बनून ठाणे तहसिल कार्यालयातून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. त्यामुळेच, 13 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर आनंद दिघेंच्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तहसिल कार्यालयाशी संबंधित आनंद दिघेंच्या आठवणींना फेसबुकवरुन उजाळा दिला आहे. 

दिपक नलावडेंनी सांगितलेला आनंददायी किस्सा

आनंद दिघेंना मे, जून, जुलै महिन्यात त्यांच्या टेंभी नाका येथील मठात १०वी, ११ वी, १२ वीची मुले त्यांचे आईवडील किंवा मित्र जमा होत. कोणाला डोमिसाईल, कोणाला जातीचा दाखला, कोणाला उत्पन्नाचा दाखला हवा असायचा, त्यासाठी या सर्व मुलांनी ठाणे तहसिलदार कार्यालयात अर्जदेखील केलेला असायचा. दाखला मिळविण्याची घाई सर्वांनाच असे. मात्र, तहसिल कार्यालयातील मर्यादीत स्टाफ, आजच्या सारखा सेतू किंवा कॉम्प्युटरही नसायचा. त्यामुळे, सर्व दाखले हातानेच बनवायचे, त्यातही प्रचंड गर्दी. मग दाखले लवकर मिळविण्यासाठी ही गर्दी तहसीलदार ऑफीस सोडून टेंभी नाक्यावरील दिघेंच्या आश्रमात जात. कारण, त्यावेळचे ठाणे तहसीलदार डी. एन. दलाल, एस. पी. परांजपे व त्यांचा स्टाफ दिघेंवरील प्रेमापोटी त्यांनी सांगितलेले काम तात्काळ मार्गी लावत असत. त्यामुळेच, दररोज १५/२० मुले आणि त्यांच्या आई-वडिलांना घेऊन आनंद दिघे तहसिलदार कार्यालयात पोहोचत असायचे. त्यामुळे, मुलांना लवकर दाखले मिळायचे. 

त्यावेळी मी दिपक नलावडे, श्याम सुतार, रविंद्र घोलप, माया भोईटे, संगिता पंडीत (पवार), भरत दिवाडकर, प्रभाकर थोरात असे आम्ही क्लार्क होतो, तसेच चंद्रकांत बिडवी, वसंत पाटील, प्रभाकर साळवी असे सिनियर्स होते. दिघेंचं काम म्हंटलं की, आम्ही सर्वजण एकीने काम करायचो, त्यामुळेच दिघेही आमच्यावर खूप खुश असायचे. ठाणे तालुका हा बेलापूरपासून उत्तर भाईंदर व दहिसर मोरीपासून ते बोरिवलीपर्यंत असा विस्तीर्ण होता. तेथील मुलांना फक्त दाखल्यासाठी ठाण्याला यावे लागायचे. म्हणून मी दिघे साहेबांना सुचविले की, सुट्टीच्या दिवशी भाईंदर, वाशी आणि ठाण्यात दाखले देण्यासाठी एक कॅम्प आयोजित करावा, की जेणेकरून विद्यार्थ्यांचा त्रास वाचेल, त्यांना दाखले लवकर मिळतील आणि तहसीलदार कार्यालयावर इतर दिवशी पडणारा भार कमी होईल. दिघेंना माझी आयडिया आवडली, लगेच दिघेंनी तत्कालीन तहसीलदार डी. एन. दलाल यांना भेटून ही कल्पना सांगितली. त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आणि असे जातीचे दाखले देण्याचे कॅम्प निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आले. 

त्यानंतर, काही दिवसांनी मी, विजय रिकामे, विशाल इंदुलकर, रविंद्र घोलप आणि इतर कर्मचाऱ्यांनी असे ठरवले की कोणताही, म्हणजे जातीचा दाखला, डोमिसाईल, वास्तवाचा दाखला, इत्यादीसाठी अर्ज आला की त्याचदिवशी तयार करून ठेवायचा आणि विद्यार्थ्यांना दोन दिवसातच दाखला द्यायचा. खरोखरच विजय रिकामे, विशाल इंदुलकर, रविंद्र घोलप व इतर ह्यांच्या परिश्रमाने, साथीने आणि तहसिलदार प्रभाकर साळवी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन दिवसात दाखला देण्याची योजना परिपूर्णत्वास नेली. त्यामुळे, कोणीही कोणत्याही राजकीय कार्यकर्ते किंवा नेत्याकडे तहसील ऑफीसच्या कामासाठी जाण्याचे बंद झाले. अर्थातच, आनंद दिघेंकडीलही गर्दी कमी झाली. मग, एकदा आनंद दिघे तहसिलदार प्रभाकर साळवींना भेटायला आले. त्यावेळी, दिपक नलावडे बद्दल आणि तुमच्याबद्दल तक्रार करायला आलो आहे, असे ते म्हणाले. त्यांचा चेहराही रागात असल्यावर गंभीर असतो तसाच होता. (प्रसाद ओकने तेच गंभीर भाव त्यांची भूमिका करताना जसेच्या तसे केलेले आहेत) तहसिलदार प्रभाकर साळवींनी मला बोलावले आणि दिघेंसमोर सांगितले की, दिघे तुझी तक्रार घेऊन आले आहेत. मी दिघेंकडे पाहिले, त्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्या स्टाईलने दाढी वरुन हात फिरवत माझ्याकडे पाहिले, मग मी सुद्धा मनातून खूप घाबरलो. पण, का जाणे मला काहीतरी गडबड आहे असंच वाटायचं. मग, मी थोडा धीर धरुन तहसिलदार प्रभाकर साळवी ह्यांना बोललो की, दिघे माझ्या विरुद्ध तक्रार करुच शकत नाहीत. तक्रार करण्यासारखं मी काही केलंच नाही. माझं हे वाक्य ऐकून आधी दोघेही गंभीर नजरेने, नंतर दोघेही एकदम हसायला लागले. मला कळलंच नाही काय झालं ते. मग, मला तहसिलदार प्रभाकर साळवी बोलले की, अरे बाबा ते खरंच तुझी आणि माझीही तक्रार घेऊन आले आहेत. 

दिघेंची तक्रार अशी आहे की, आपण दोघे या कार्यालयात आलात, जनतेची कामं एवढी फास्ट करतायंत. त्यामुळे कोणीच आडत नाहीत, म्हणून माझ्याकडे आता कोणीच येत नाही, आश्रमातील गर्दी का कमी झाली. खरंच तुमचं काम खूप चांगलं आहे, अशी गोड तक्रार घेऊन आले आहेत, असे साळवींनी म्हटले. मग, आम्ही तिघेही हसायला लागलो. त्यावेळेस आनंद दिघेंनी केलेले हास्य मी अजूनपर्यंत विसरलेलो नाही, कारण ते खूप कमी प्रमाणात हसत असत. मग, आनंद दिघे आणि तहसिलदार प्रभाकर साळवी ह्या दोघांच्याही मी पाया पडलो. त्यावेळी, आनंद दिघेंनी मला काय आशिर्वाद दिले माहीती का?. "असाच निस्वार्थीपणे गोरगरीबांची, अडले नडलेल्यांची कामं करत रहा" 

अशी आठवणीची भली मोठी पोस्ट दिपक नलावडे यांनी फेसबुकवरुन शेअर केली आहे. 
 

Web Title: ... Anand Dighe reached the tehsil office in anger, the retired clerk said about memories of anand dighe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.