सोमय्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:18+5:302021-09-25T04:26:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत ...

NCP workers should exercise restraint during Somaiya's visit | सोमय्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा

सोमय्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संमय ठेवावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. कोणत्या तरी घटनेने आपल्यासह पक्ष बदनाम होईल, असे गैरकृत्य करू नका, असे करणारा माझा कार्यकर्ता नसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आणि तपास यंत्रणेला आम्ही योग्य ती माहिती देऊ. संताजी घोरपडे साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत. ते ९४ कोटी शेअर भांडवलाबद्दल बोलतात, यामध्ये एकही पैसा चुकीचा नाही. आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना दहा वर्षांपूर्वी पुण्यातील माझ्या मित्राने चालविण्यासाठी घेतला. गेल्या आठ वर्षात अनेक अडचणी आल्याने कंपनीला ८० कोटींचा तोटा झाला. त्यामुळे दोन वर्षे अगोदरच कंपनीने कारखाना सोडून दिला. सोमय्यांनी केलेल्या आरोपांची तपास यंत्रणेला सगळी उत्तरे देऊ. मात्र ज्या पध्दतीने त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी भाषा वापरली, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीसे संतप्त झाले, त्यातून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले, त्यामध्ये कोठे घोटाळा झाला असेल तर जरुर चौकशी लावा. मात्र दहा-पंधरा वर्षांपूर्वी उभारलेल्या कारखान्याबाबत आरोप करणे चुकीचे आहे. अनेक भाजपच्या नेत्यांनी माझ्या कामाच्या पध्दतीबद्दल विधिमंडळात जाहीर कौतुक केले, आताही ते मुश्रीफ यांच्या हातून असे होणार नाही, असे सांगतात. किरीट सोमय्यांनी मंगळवारी कोल्हापुरात यावे, त्यांना हवे ते बघावे, मात्र येथे येऊन चुकीची भाषा वापरू नये, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

‘ब्रिक्स’ कंपनीचे हार घालून स्वागत करा

गडहिंग्लज साखर कारखाना तोटा सहन करून चालविणाऱ्या ‘ब्रिक्स’ कंपनीचे तपास यंत्रणेने हार घालून स्वागत केले पाहिजे. साखर उद्योग कोणत्या अडचणीतून जातोय, हे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना विचारावे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे, राजेश लाटकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजीव आवळे आदी उपस्थित होते.

मंत्र्यांना घाबरवण्यासाठी तपास यंत्रणेचा वापर

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांच्या मागे चौकशीचा सिसेमिरा लावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या आडून मंत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.

शरद पवार यांना आपल्याबद्दल खात्री

सोमय्यांनी आरोप केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. आपला कार्यकर्ता असे करणार नाही, याबद्दल त्यांना खात्री असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: NCP workers should exercise restraint during Somaiya's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.