बीड जिल्ह्यात ‘हुमणी’चा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:21 AM2018-09-07T00:21:51+5:302018-09-07T12:17:24+5:30

यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

Attack of 'Humani' in Beed district | बीड जिल्ह्यात ‘हुमणी’चा हल्लाबोल

बीड जिल्ह्यात ‘हुमणी’चा हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देसोयाबीन, तूर, कपाशीला फटका : उसाचे फडही अळी पोखरु लागली

- अनिल भंडारी 

बीड : यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. मागील काही दिवसांपासून उसामध्ये पोक्काबोंग रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे उसाची वाढ जागेवरच थांबण्यास सुरुवात झाली आहे.

संपूर्ण ऊस क्षेत्रामध्ये हवामानातील बदलामुळे कांडी कीड, खोड कीड, खवले कीड, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. सोबतच हुमणीनेही मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने उसाचा संपूर्ण फड जळण्याच्या अवस्थेत आहे. जोपासलेल्या उसाची होणारी ही अवस्था पाहून शेतकरी हैराण झाले आहेत. एखाद्या शत्रूने हल्ला करावा याप्रमाणे ऊस उत्पादकांची बिकट अवस्था झाली आहे. या परिस्थितीत कृषी विभागाकडून मात्र पुरेशी जनजागृती होत नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे, तर दुसरीकडे आधीच बोंडअळीने त्रस्त झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना हुमणीचाही सामना करावा लागत आहे. तसेच सोयाबीन आणि तुरीवरही हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

देठाला धक्का : कोसळतो ऊस
मातीमध्ये हुमणीच्या अळ्या पिकाची मुळे कुरतडतात, उसामध्ये घुसतात. त्यामुळे ऊस जळण्यास सुरुवात होते. कालांतराने संपूर्ण ऊस पिवळा पडून जळून जातो. उसाच्या देठाला धक्का जरी लागला, तरी तो खाली कोसळतो, इतक्या प्रमाणात हुमणीने उसाला पोखरले आहे.

रबी हंगामाची चिंता
खरिपातील जवळपास सर्वच पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हुमणीचा वाढता प्रभाव पाहता आणि हुमणीच्या अळीचे आयुष्य साधारण १ वर्ष लक्षात घेता आगामी रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने आतापासूनच उपाययोजनांची गरज आहे.

सर्वच उसात शिरकाव
पोक्काबोंग आणि हुमणीचा सर्वाधिक फटका २६५, ८६०३२, ८००५, १०००१ आदी जातीच्या ऊस पिकाला बसला आहे. शेंड्याचे वाढे लहान होणे, उसाची वाढ थांबणे, विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव या उसामध्ये पाहयला मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हंगामापासूनच होती उपायांची गरज,जनजागृतीचा अभाव
मागील वर्षी बुलडाणा, जालना जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव जाणवला होता. त्या पार्श्वभूमीवर जनजागृती महत्त्वाची होती. मात्र, हुमणी नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाकडून अद्याप फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत.खरीप हंगाम सुरू झाल्यापसून याकडे लक्ष देण्याची गरज होती.
कपाशीवर पडलेल्या बोंडअळी नियंत्रणासाठी मोठा गाजावाजा करीत राज्य पातळीवर क्षेत्र भेटी आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, हुमणीच्या नियंत्रणासाठी ठोस उपाय केल्याचे दिसत नाही.

ऊस उत्पादकतेत मोठी घट
हुमणी टाळण्यासाठी बेणे प्रक्रिया करुनच ऊस लागवड करावी. लागवडीच्या वेळी एकरी १० किलो फर्टेरा किंवा फिप्रोनील सरी डोससोबत द्यावे. यावर्षी हुमणी किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन नवीन लागवड होणाºया व मोठ्या उसामध्ये एकरी दोन लिटर मेटारायझिम ड्रेचिंग (आळवणी) करावी. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर ऊस उत्पादकतेत मोठी घट येऊ शकते. बीड जिल्ह्यात सध्या १२ हजार हेक्टरातील उसाला फटका बसला आहे.

उपाययोजना करून वेळीच संकट टाळा, भरपाई द्या
माजलगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी विशिष्ट जातीच्या उसाची लागवड करण्यासाठी शेतकरी सभासदांवर सक्ती केली होती. २६५ जातीच्या उसाला प्रतिबंध केला होता. आम्हाला आंदोलन करावे लागले. त्यानंतर नमते घेणाºया कारखान्यांनी हट्ट करीत छुपा अजेंडा चालविला. पाच हजार रुपये टनाने शेतकºयांनी बेणे घेतले. महिनाभरापासून हुमणीमुळे ऊस गळून पडत आहे. फड जळत आहे. लाखो टन ऊस बरबाद होत आहे. तातडीने उपाय करावेत. नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी. नसता आंदोलन करावे लागेल, असे शेतकरी नेते गंगाभिषण थावरे म्हणाले.

Web Title: Attack of 'Humani' in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.