EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 10:39 AM2021-11-20T10:39:34+5:302021-11-20T12:08:03+5:30

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितला विरोधी पक्षनेत्यांमधला चांगला गुण

devendra fadnavis connect with people very well says ncb leader nawab malik | EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका

EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहीमच उघडली आहे. सातत्यानं पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सनसनाटी आरोप केले. फडणवीस सत्तेत असताना त्यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचं रॅकेट सुरू होतं, असा दावा मलिक यांनी केला.

सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी लोकमतच्या फेस टू फेस कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील चांगला गुण कोणता, असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र लोकांशी चांगले संबंध ठेवतात. माणसांशी कनेक्ट होणं हा त्यांच्यातील चांगला गुण आहे. मी एकदा त्यांना डिनरला बोलावलं होतं. त्यावेळी ते आले होते. ते माणसांसोबतचं नातं उत्तमपणे जपतात, असं मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्नदेखील मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर माणसांशी उत्तम संबंध राखणं याचाच धागा पकडत मलिक यांनी याच गुणाचा तोटा सांगितला. फडणवीस माणसांशी संबंध व्यवस्थित ठेवतात. मात्र त्यांना माणसं नीट ओळखता येत नाहीत. त्यांना त्यांच्या आजूबाजूला उपरे गोळा करून ठेवले आहेत, असं मत मलिक यांनी मांडलं.

तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस कोणते, असा प्रश्न मलिक यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर गेले ४० दिवस आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते, असं मलिक यांनी सांगितलं. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुंबईजवळ क्रूझ बोटीवर एनसीबीनं धाड टाकली. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती अशी माहिती एनसीबीनं दिली. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अनेकांना अटक करण्यात आली.

एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारवाईच्या आडून एनसीबीचे अधिकारी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप करून मलिक यांनी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंनी केलेल्या अनेक कारवायांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर वानखेडेंचा पाय खोलात सापडला. त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली.

Web Title: devendra fadnavis connect with people very well says ncb leader nawab malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.