"ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम" च्या जयघोषात दुमदुमली अलंकापुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:40 PM2021-12-02T18:40:06+5:302021-12-02T18:40:16+5:30

भावपूर्ण वातावरणात माऊलींचा ७२५ वा अर्थातच रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात पार पडला

celebrate sanjivan samadhi sohala in alandi | "ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम" च्या जयघोषात दुमदुमली अलंकापुरी

"ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम" च्या जयघोषात दुमदुमली अलंकापुरी

googlenewsNext

आळंदी : ''ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम'' असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष, घंटानाद... समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे.. अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा ७२५ वा अर्थातच रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले.

तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे - पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. महादेव महाराज नामदास यांचे कीर्तन सुरु झाले. यावेळी विनामंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती.

दरम्यान मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ - मृदुंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत विना मंडपातून करंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभार्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करून ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'' अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला.

Web Title: celebrate sanjivan samadhi sohala in alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.