रात्र वैऱ्याची... ‘त्या’ व्हिडिओ काॅलमुळे उडू शकते तुमची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:10 AM2022-06-27T08:10:09+5:302022-06-27T08:13:15+5:30

यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी....

sextortion that video call can blow your sleep cyber crime pune latest crime news | रात्र वैऱ्याची... ‘त्या’ व्हिडिओ काॅलमुळे उडू शकते तुमची झोप

रात्र वैऱ्याची... ‘त्या’ व्हिडिओ काॅलमुळे उडू शकते तुमची झोप

googlenewsNext

-नारायण बडगुजर

पिंपरी : महिला किंवा तरुणी व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे करतात. त्याचे रेकाॅर्डिंग करून संबंधित व्यक्तीकडे पैशांची मागणी करून खंडणी उकळली जाते. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली जाते. असे प्रकार शहरातील काही नामांकित व्यक्तींसोबत घडत आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारी वाढत आहेत. रात्री असे काॅल येण्याचे प्रमाण जास्त असून, ते काॅल रिसिव्ह केलेल्या अनेकांची झोप उडाली आहे.

सोशल मिडियावर सायबर गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. फेसबुक अकाउंटधारकाच्या प्रोफाईलमधील मोबाईल क्रमांकावरून सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीला संपर्क करतात. चॅटिंग करून विश्वास संपादन करतात. त्यानंतर व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे केले जातात. असे काॅल तरुणींकडून केले जातात. व्हिडिओ काॅल करणारी तरुणी ही विवस्त्र असते. अश्लील चाळे करून व्हिडिओ काॅलचे रेकाॅर्डिंग केले जाते. संबंधित व्यक्ती ही अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. खंडणी म्हणून सुरवातीला १० ते १५ हजार रुपयांची मागणी केली जाते. पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडून जास्त रकमेची मागणी होते.

यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी

पैसे न दिल्यास अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्याची धमकी दिली जाते. तसेच नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवून बदनामी करण्याचे सांगितले जाते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर पाठविला जातो. त्यामुळे संबंधित व्यक्ती घाबरून पैसे देण्यास तयार होते. मात्र, काही जण पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार करतात.

बदनामीच्या भितीने पोलिसांकडे तक्रार नाही

काही प्रतिष्ठित व्यक्ती बदनामीच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून पैशांची मागणी सुरूच असते. कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता संबंधितांनी पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

अनोळखी व्हिडिओ काॅल नकोच...

अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडिओ काॅल रिसिव्ह करू नये किंवा रिसिव्ह करताना आपला चेहरा कॅमेऱ्यासमोर येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. शक्यतो बॅक कॅमेऱ्याचा वापर करावा. जेणेकरून संबंधितानी व्हिडिओ काॅलचे रेकाॅर्डिंग केले तरी आपला चेहरा त्यात येणार नाही.
तरुणी म्हणते, विवस्त्र व्हा...काही मोबाइलधारक सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत ‘ॲक्टीव’ असतात. याच वेळेस सायबर गुन्हेगार देखील सक्रीय होतात. रात्री उशिरा चॅटिंग करून मोबाइलधारकाला व्हिडिओ काॅल करतात. काही जण त्यांना प्रतिसाद देत काॅल रिसिव्ह करतात. त्यानंतर व्हिडिओ काॅल करणारी तरुणी विवस्त्र होऊन अश्लील चाळे करते. तुम्ही देखील विवस्त्र व्हा, असे म्हणून मोबाइलधारकाला देखील विवस्त्र होण्यास भाग पाडले जाते. यातून ‘सेक्सटाॅर्शन’ केले जाते.

सेक्सटाॅर्शनबाबत जानेवारी ते जून दरम्यान सायबर सेलकडे प्राप्त तक्रारी
पुरुष तक्रारदार - ३६
महिला तक्रारदार - १५
एकूण तक्रारी - ५१

सोशल मीडियावर आपले प्रोफाईल संरक्षित असावे. तसेच आपले संपर्क क्रमांक त्यावर नमूद करण्याचे टाळावे. अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करू नये. तसेच व्हिडिओ काॅल रिसिव्ह करताना खबरदारी घ्यावी. संबंधित मोबाइल क्रमांक परिचित व्यक्तिचाच आहे का, याची खातरजमा करावी. त्यानंतरच व्हिडिओ काॅल घ्यावा.
- डाॅ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

Web Title: sextortion that video call can blow your sleep cyber crime pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.