गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 03:04 PM2019-10-15T15:04:52+5:302019-10-15T15:08:34+5:30

 युवकांसाठी एक अद्ययावत केंद्र उभारणार; सर्व समाजघटकांसाठी काम करणार

Maharashtra Election 2019 : Development of Guntherwari, Water, Employment and Priority for Industry on Mark : Atul Sawe | गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे

गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे

googlenewsNext
ठळक मुद्देशहराला रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढण्यासाठी प्रयत्न करणार. नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांच्या आत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न. माझी पुन्हा एकदा एमआयएमशी लढत होणार आहे.

- नजीर शेख  

औरंगाबाद : मागील पाच वर्षांत आमदार म्हणून आणि अल्पकाळ मिळालेल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत मी शहरातील नागरिकांसाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच मला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाची पक्षसंघटना, शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची साथ या बळावर मी पुन्हा विजयी होईन, असा दावा भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार अतुल सावे यांनी केला आहे. 

‘लोकमत’शी संवाद साधताना त्यांनी मागील आणि भविष्यातील पाच वर्षांच्या कामाची रूपरेषाच मांडली. सावे म्हणाले, भारतीय जनता पक्षाची बूथ यंत्रणा, शक्तिकेंद्र या माध्यमातून एक सक्षम प्रचार यंत्रणा आहे. ती यंत्रणा माझ्या मतदारसंघात राबत आहे. याशिवाय शिवसेनेचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते माझ्या प्रचारात सक्रिय आहे. बूथप्रमुखांमार्फत पक्षाची कामे आणि ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोहोचली आहेत. याशिवाय उज्ज्वला गॅस योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा लोन आणि कौशल्य विकास योजनेच्या लाभार्थ्यांना भेटून त्यांना इतर नागरिकांना पक्षासाठी मतदान करावे, असे आवाहन करीत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात शेततळी, विहिरी यांचे लाभार्थी मात्र जे शहरात राहतात अशांनाही संपर्क करून सक्रिय करीत आहोत. माझ्या प्रचारात युवक, युवती सर्व वयोगटातील आणि समाजातील व्यक्ती कार्यरत आहेत. 

वैयक्तिकरीत्या मी पदयात्रा, कॉर्नर बैठका आणि नागरिकांच्या भेटी तसेच युवकांशी आणि ज्येष्ठांशी संवाद या पद्धतीने प्रचार करीत आहे. हा संवाद साधताना मी नागरिकांचे प्रश्नही समजून घेत आहे. औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ ४० टक्के गुंठेवारी वसाहतींचा आहे. उच्चभ्रू वस्ती तसेच मध्यमवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचीही मोठी संख्या माझ्या मतदारसंघात आहे. या सर्वांसाठी मला काम करावयाचे आहे आणि या सर्वांचा मला पाठिंबाही मिळत असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.   

शहराचा पाण्याचा प्रश्न काही कारणांमुळे मार्गी लागलेला नव्हता, असे सांगून अतुल सावे म्हणाले, आता नव्याने १३०० कोटी रुपयांची योजना मंजूर झाली असून, त्याचे काम जीवन विकास प्राधिकरणामार्फत होणार आहे. या कामाची निविदाही निघाली आहे. ही योजना राबविण्यासाठी मी अगदी रात्री १ वाजता मुख्यमंत्री बंगल्यावर जाऊन त्यांची सही आणली आहे. मंत्रिपद मिळाल्यावर स्वागत, सत्कार न स्वीकारता नव्या जलवाहिनीसंदर्भात थेट नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसेकर यांना भेटायला गेलो. विभागीय आयुक्त आणि मनपा आयुक्तांची बैठक लावून सर्व अडथळे दूर करून या योजनेचा ५०              दिवसांचा ‘बार चार्ट’ तयार केला. जे करायचे ते मनापासून अशी माझी कामाची पद्धत आहे. मागील पाच वर्षांच्या काळात गुंठेवारी भागासाठी ५० टक्के कामे केली. येणाऱ्या काही वर्षांत उरलेली ५० टक्के कामे पूर्ण करण्याचा            मानस आहे. उद्योगांच्या ‘स्टॅम्प ड्यूटी’चा प्रश्नही मार्गी लावला आहे. आतापर्यंत एकूण १२४ कोटींचे व्हाईट टॉपिंगचे रस्ते मंजूर करवून आणले आहेत. मतदारसंघातील १६ रस्ते व्हाईट टॉपिंगचे तयार केले. यामध्ये माझ्या मतदारसंघासह शहरातील इतरही मतदारसंघ आहेत. 

लढत एमआयएमशीच
माझी पुन्हा एकदा एमआयएमशी लढत होणार आहे. आमदार म्हणून, तसेच अल्पसंख्याक विभागाचा राज्यमंत्री असल्याने मी अल्पसंख्याक समाजासाठीही काम केले आहे. उर्दू अकादमीचा राज्याचा कार्यक्रम मी या शहरात आणला. मला सर्व समाजासाठी काम करावयाचे आहे. एमआयएमच्या उमेदवाराबद्दल मला काहीच म्हणावयाचे नाही. मला मतदारांचा पाठिंबा आहे, एवढेच मी म्हणू शकतो. 

आमदार म्हणून आणि मंत्रीपदाच्या अल्पकाळात केलेली कामे 
- गुंठेवारी भागातील अनेक वसाहतींमध्ये पाणी, ड्रेनेज आणि अंतर्गत रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गुंठेवारी भागात सध्या २५० कोटी रुपयांची कामे चालू आहेत.
- मतदारसंघात मोठ्या संख्येने रस्त्यांची कामे केली. आधी २४ कोटी आणि नंतर १०० कोटी रुपये मंजूर करवून आणले. आणखी शंभर कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. 
- ग्रामपंचायत आणि उद्योगांमध्ये कर वसूल करण्यावरून वाद होता, तो प्रश्न मिटविण्यामध्ये यश आले. 
- राज्यातील सर्वात मोठी औरंगाबाद शहरासाठी १३०० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा मंजूर करवून आणली आणि त्याचे कामही मार्गी लावले. 
- उद्योग क्षेत्रात अत्यंत कमी काळात ३३०० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली. 
- औरंगाबादहून दिल्ली, जयपूर आणि मुंबईसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. 
- जातीपातीचा विचार न करता मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच आरोग्य शिबिरे घेऊन सामान्य मतदारांची आरोग्यविषयक सेवा केली. 


माझे व्हिजन
- औरंगाबाद हे शहर राज्याची पर्यटन राजधानी आहे. या शहराला रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढण्यासाठी प्रयत्न करणार.

- पर्यटनाशी संबंधित शहरातील सर्व घटकांची एक समन्वय समिती स्थापन करणार. 
- नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांच्या आत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न. 
- गुंठेवारी भागातील नागरिकांची घरे नियमितीकरण आणि रस्ते, पाणी, ड्रेनेजची सुविधा निर्माण करण्यावर भर.
- आगामी काळात औद्योगिक क्षेत्रात पाच ते सहा नवे उद्योग आणणार. तसेच दोन आयटी पार्क आणण्यासाठी प्रयत्न करणार.
- आगामी पाच वर्षांत किमान १५ हजार तरुणांना रोजगार आणि नोकरीची संधी उपलब्ध करणे.
- युवक आणि विद्यार्थी यांना विविध प्रकारच्या मार्गदर्शनासाठी मतदारसंघात एक अद्ययावत केंद्र उभारणे. 
- मतदारसंघात अल्पसंख्याक कौशल्य विकासाची नवी आठ केंद्रे स्थापन करणे. 
- औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने प्रयत्न करणे. 


मी काम करताना कोणताही दुजाभाव करीत नाही. मंत्रिपदाच्या अल्पकाळात मी शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा प्रश्न सर्व समाजघटकांचा आहे. आमदार म्हणून काम करताना सर्व समाज घटकांकडे आणि विविध भागांकडे लक्ष दिले. याचा मला या निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे. 
- राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग, अल्पसंख्याक राज्यमंत्री

Web Title: Maharashtra Election 2019 : Development of Guntherwari, Water, Employment and Priority for Industry on Mark : Atul Sawe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.