वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 11:47 AM2019-08-20T11:47:00+5:302019-08-20T12:02:49+5:30

एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही

Prakash Ambedkar will be waiting for MIM | वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख अससोद्दिन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र वंचित आणि एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने एमआयएमची चिंता वाढली आहे. तर महाआघाडी सोबत जाणेबाबतीच्या चर्चेवर अंतिम निर्णय होईपर्यंत एमआयएमला प्रकाश आंबेडकर वेटिंगवर ठेवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुद्धा सुरु केल्या आहेत. मात्र एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही. एमआयएमने काही दिवसांपूर्वी ९८ जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे दिला होता. त्यावेळी वंचितच्या कोअर कमिटीने यावर लवकरच निर्णय घेण्याचा आश्वासन दिले होते. मात्र तीन आठवडे उलटूनही अद्यापही यावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एमआयएमच्या सोबत राहणार का ? यावरून एमआयएमच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत वंचित बहुजन आघाडी जाण्याच्या मुद्यावरून दोन्ही बाजूचे नेते सकारात्मक आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाचा महाआघाडीला दिलेला प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाही. असे असले तरीही वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे महाआघाडी सोबतचा निर्णय अंतिम होईपर्यंत एमआयएमला जागावाटप बाबत शब्द देण्यासा आंबेडकर टाळत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे एमआयएममध्ये मात्र यावरून चिंतेचे वातावरण पाहायला  मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत अससोद्दिन ओवेसी, प्रकाश आंबडेकर आणि इम्तियाज जलील यांच्यात बैठक झाली होती. यावेळी एमआयएमला किती जागा हव्या आहेत, याचा प्रस्ताव द्यावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर एमआयएमने ९८ जागांचा प्रस्ताव वंचित आघाडीकडे दिला होता. मात्र त्यावर अजूनही कोणताच निर्णय एमआयएमला कळवण्यात आला नाही. त्यामुळे एमआयएमकडून इच्छुक असलेल्या उमेदवार यांची चिंता वाढली आहे.

 

 

Web Title: Prakash Ambedkar will be waiting for MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.