‘काकस्पर्श’ होईना... गावावर चक्क कावळा रुसलाय! कावकाव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:48 PM2021-09-29T18:48:54+5:302021-09-29T19:00:38+5:30

satara : गावांतील स्मशानभूमीकडे गेल्या कित्येक वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय.

Villagers try to hear the Crow voice in satara | ‘काकस्पर्श’ होईना... गावावर चक्क कावळा रुसलाय! कावकाव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न

‘काकस्पर्श’ होईना... गावावर चक्क कावळा रुसलाय! कावकाव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न

Next

- संजय पाटील

कऱ्हाड : पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना नैवेद्य दिला जातोय. बहुतांश गावांत या नैवेद्याला ‘काकस्पर्श’ही होतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडीसह अन्य काही गावांचं दुखणं वेगळंच आहे. या गावांतील स्मशानभूमीकडे गेल्या कित्येक वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय.

जखिणवाडी गावात हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांत एकही ‘ठाव’ कावळ्याने शिवला नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. नदीकाठावर गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही, हीच सल ग्रामस्थांच्या मनात आहे. कावळा दृष्टीस पडणे दूरच; पण दूरवरून त्याची ‘कावकाव’ही ऐकायला येत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. कावळे गावावर रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे निर्माण झालीय. कावळ्यांना खूश करण्यासाठी अंधश्रद्धेतून येथे अनेक मार्ग काढले जातायत. वेगवेगळे विधी केले जातायत; पण परिस्थिती बदलत नाही, असे येथील ग्रामस्थ म्हणतात.

चचेगावातही हीच स्थिती आहे. कावळे रुसल्याचा समज करून घेऊन ग्रामस्थ ‘उपाय’ शोधण्याच्या मार्गावर आहेत. ‘काही वर्षांपूर्वी अंत्यविधीचा नैवेद्य शिवायला एकतरी कावळा यायचा; पण सध्या स्मशानभूमीत एकही कावळा दिसत नाही. अंत्यविधीवेळी कावळ्याची वाट पाहणंच आता आम्ही सोडून दिलंय, असं तेथील ग्रामस्थ सांगतात. नारायणवाडीतही ग्रामस्थ आता कावळ्याची वाट पाहत नाहीत. वाट पाहणं व्यर्थ ठरतंय, असं तेथील ग्रामस्थांचंही मत आहे.

दीड वर्ष स्मशानभुमीत नैवेद्य
जखिणवाडीच्या ग्रामस्थांनी कावळ्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेत. स्मशानभुमीत दररोज नैवेद्य ठेवावा, असे एकदा सांगण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी सलग दीड वर्ष दररोज स्मशानभुमीत गोडाचा नैवेद्य ठेवला. दररोज एका घरातून हा नैवेद्य जायचा. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. एकही नैवेद्य कावळ्याने शिवला नाही.

सर्वभक्षी असूनही कावळा गायब!
कावळा सर्वभक्षीय आहे. त्यामुळे भक्ष्य उपलब्ध नसल्याने त्याची संख्या घटली, असे म्हणणे उचित ठरणार नाही. ‘स्वच्छतादूत’ म्हणून हा पक्षी परिचित आहे. पिकांवरील किटकनाशकांच्या वापरामुळे कावळ्यांवर दुष्परिणाम झाला असल्याने त्यांची संख्या घटल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे; पण हेच मूळ कारण आहे का, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान पक्षी तज्ज्ञांसमोर आहे.

खाद्य आणि सुरक्षितता असेल त्याठिकाणी कावळा हमखास असतो. तो सर्वभक्षी आहे. शिवारात मोठ्या प्रमाणावर खाद्य असेल तर कावळे स्मशानभुमीकडे फिरकत नसावेत. किंवा स्मशानभुमी परिसरात त्यांना सुरक्षितता वाटत नसावी.
- सुधीर कुंभार, संचालक
एम. एन. रॉय पर्यावरण संस्था

जखिणवाडी गावावर कावळ्यांचा रूसवा आहे. आजपर्यंत याबाबत आम्ही अनेकांचे मार्गदर्शन घेतले आहे. गावची स्मशानभुमी गर्द झाडीत आहे. मात्र, या झाडीत एकही कावळा येत नाही. याचे कारण अद्याप आम्हाला समजलेले नाही. अनेक वर्षापासून ही परिस्थिती आहे.
- रामदादा पाटील
ग्रामस्थ, जखिणवाडी

डोमकावळा अन् गावकावळा
१) कावळा हा पक्षी वर्गाच्या ‘काक’ कुलातील पक्षी आहे.
२) ‘गावकावळा’ व ‘डोमकावळा’ असे त्याचे दोन प्रकार आहेत.
३) गावकावळ्याच्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते.
४) मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो.
५) डोमकावळ्याची चोच धारदार आणि बळकट असते. तसेच चकचकित काळाभोर रंग असतो.

Web Title: Villagers try to hear the Crow voice in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.