भेंडाळा फाट्यावर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:05 AM2021-01-23T04:05:16+5:302021-01-23T04:05:16+5:30

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगापूरकडे जाणारी वाहतूक ...

Need for traffic signal at Bhendala fork | भेंडाळा फाट्यावर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता

भेंडाळा फाट्यावर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता

googlenewsNext

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगापूरकडे जाणारी वाहतूक आणि पुण्याकडे सरळ जाणारी वाहतूक दिवसभर समोरासमोर येत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. येथे तात्काळ ट्रॅफिक सिग्नलची यंत्रणा बसवून पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची गरज भासत आहे.

भेंडाळा फाटा हे औरंगाबाद- अहमदनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने हॉटेल्स, व्यावसायिक प्रतिष्ठान आणि पेट्रोलपंप यामुळे भेंडाळा फाट्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. गंगापूरकडे वळणारी वाहतूक आणि पुणे-अहमदनगरकडे सरळ जाणारी वाहतूक वारंवार समोरासमोर येत असल्याने भेंडाळा फाट्यावर दिवसभर वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातही वाळूज-पंढरपूर येथील औद्योगिक वसाहतींची पुण्यातील औद्योगिक वसाहतीशी दररोजची देवाण-घेवाण असल्याने या मार्गावरून अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू असते. तसेच, गंगापूर- वैजापूर रस्त्याचे काम नव्याने झाल्यानंतर औरंगाबादहून नाशिक आणि मुंबईकडे जाणारी बरीचशी वाहतूक गंगापूरमार्गे वळवली आहे. त्याचा परिणामही भेंडाळा फाट्यावरच्या वाहतुकीवर झाला आहे. औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, श्रीरामपूर, नेवासा, नाशिक, मनमाड, शिर्डी, येवला, कोपरगाव, सिन्नर, घोटी आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक येथून प्रचंड वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भेंडाळा फाट्यावर ट्रॅफिक सिग्नल सुरू करणे आवश्यक बनले आहे.

चौकट :

पादचाऱ्यांनाही धोका

भेंडाळा फाटा येथून औरंगाबाद आणि गंगापूर येथे शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या आणि वाळूज-पंढरपूर येथील औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथून होणारी वाहतूक भरधाव वेगाने सुरू असते. त्यामुळे भेंडाळा फाट्यावर ये-जा करण्यासाठी उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या जिवालाही सिग्नल नसल्याने धोका निर्माण झाला आहे.

कोट

भेंडाळा फाट्यावरील वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अपघात वाढल्याने येथील वाहतूक नियंत्रण होणे आवश्यक बनले आहे.

- शुभम बोकडीया, अगरवाडगाव.

फोटो :

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे राष्ट्रीय मार्गावरील भेंडाळा फाट्यावर गंगापूरकडे वळणारी वाहतूक आणि सरळ जाणारी वाहतूक समोरासमोर येत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. (तारेख शेख)

Web Title: Need for traffic signal at Bhendala fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.