औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:33 PM2019-09-23T17:33:46+5:302019-09-23T17:35:38+5:30

काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरली जात आहे.

Maharashtra Assembly Election 2019 : Who is the Congress candidate in Aurangabad East and West? | औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

googlenewsNext
ठळक मुद्देजागा आघाडीतल्या मित्र पक्षाला सुटते की काय, अशी परिस्थिती आहे. युतीच्या भवितव्यावर चित्र

औरंगाबाद : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार राहतील, याचे अंदाज बांधले जात आहेत. तद्वतच औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण राहतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नुकताच औरंगाबादचा दौरा झाला. ते ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, तेथे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राबता राहिला व राजकीय खलबतेही झाली. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरली जात आहे. मतदारसंघ झाला तेव्हापासून औरंगाबाद पूर्ववर काँग्रेसने ताबा मिळवला. राजेंद्र दर्डा यांच्या रूपाने विकासाभिमुख आमदार व कर्तृत्ववान मंत्री मिळाले. मागच्या वेळीही तेच या मतदारसंघातून लढले होते. यावेळी कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.काँग्रेसने घेतलेल्या मुलाखतीसाठी उमेदवार आलेच नाहीत, असे नाही; पण हमखास विजय मिळवू शकेल, असा एकही चेहरा सध्या तरी काँग्रेसकडे दिसत नाही. त्यामुळेच ही जागा आघाडीतल्या मित्र पक्षाला सुटते की काय, अशी परिस्थिती आहे. 

शरद पवार यांना काँग्रेसचे जे पदाधिकारी जाऊन भेटले, त्यांनीही पूर्व आणि कन्नड राष्ट्रवादीला सोडून त्या बदल्यात पैठण आणि मध्य काँग्रेसला देण्यात यावे, असा प्रस्ताव मांडल्याचे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसअंतर्गत सध्या बरीच खदखद सुरू आहे. काँग्रेसजनच काँग्रेस संपवत आहेत, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने दिली. औरंगाबाद पश्चिम हा राखीव मतदारसंघही काँग्रेसच्या वाट्याचा. तिथे यापूर्वी चंद्रभान पारखे व डॉ. जितेंद्र देहाडे यांनी आपले नशीब अजमावले; पण यश पदरी पडले नाही.
यावेळीही बरेच उमेदवार पश्चिमची निवडणूक लढवू इच्छित आहेत; पण शिवसेनेचे, वंचित बहुजन आघाडीचे, एमआयएम व इतर रिपब्लिकन पक्ष- संघटनांच्या उमेदवारांचे तगडे आव्हान येथे राहील. ते मोडून काढणे म्हणावे तेवढे सोपे वाटत नाही. या जागेवरही काँग्रेसच्या मित्र पक्षांनी दावा ठोकलेला आहे. ही जागा त्यांना देऊ केल्यास औरंगाबाद शहरातून काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात  येत आहे. 

युतीच्या भवितव्यावर चित्र
पश्चिममधून किती उमेदवार उभे राहतील, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. भाजप- सेनेची युती न झाल्यास आणखी वेगळेच चित्र निर्माण होईल. अधिकृत उमेदवार जाहीर होऊन त्यांच्या हातात एबी फॉर्म देईपर्यंत घोळ सुरू राहणारच नाही, याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. काँग्रेसची परंपरा अशीच राहत आलेली आहे, हेही नाकारता येत नाही.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Who is the Congress candidate in Aurangabad East and West?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.