चक्क 'मेडिकल'मध्येच शिरला बोगस डॉक्टर, रुग्णाकडून उकळले १२ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 11:44 AM2021-10-12T11:44:18+5:302021-10-12T11:50:39+5:30

निवासी डॉक्टरांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत बोगस डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळले. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले.

The bogus doctor who went into chucky medical, | चक्क 'मेडिकल'मध्येच शिरला बोगस डॉक्टर, रुग्णाकडून उकळले १२ हजार रुपये

चक्क 'मेडिकल'मध्येच शिरला बोगस डॉक्टर, रुग्णाकडून उकळले १२ हजार रुपये

Next
ठळक मुद्दे‘एमएसएफ’ जवानाच्या सतर्कतेमुळे दोन दिवसात 'तो' डॉक्टर ताब्यात

नागपूर : कॅन्सरच्या रुग्णावर तातडीने उपचार करतो, असे म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळणाऱ्या बोगस डॉक्टरला ‘एमएसएफ’च्या जवानाने दोन दिवसात मोठ्या शिताफीने पकडले. मेडिकलमधील या घटनेने मात्र, रुग्ण व डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.

गरिबांवरील उपचारासाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा येथून रुग्ण येतात. बाहेरगावावरून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाची माहिती नसल्याने याचा फायदा समाजविघातक घेत असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पुष्पा नावाच्या महिलेच्या पतीला जबड्याचा कर्करोग झाल्याने २ ऑक्टोबर रोजी ती पतीला घेऊन मेडिकलला आली. डॉक्टरांनी तपासून कर्करोगाच्या वॉर्डात भरती केले. यादरम्यान निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. याचा फायदा घेत स्वप्नील नावाच्या व्यक्तीने स्वत: डॉक्टर असल्याचे सांगत रुग्णाच्या पत्नीला विश्वासात घेतले. रुग्णाच्या विविध तपासण्या कराव्या लागतील, असे सांगून यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. पत्नीने कर्ज काढून आणलेले १२ हजार ५०० रुपये स्वप्नीलला दिले. त्या दिवशी त्याने मेडिकलमध्येच त्या रुग्णाचे सिटी स्कॅन केले आणि नंतर गायब झाला. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या पत्नीला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले.

तिने मेडिकलच्या ‘महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स’चा (एमएसएफ) जवान अंकुश खानझोडे यांच्याकडे याविषयी तक्रार केली. खानझोडे यांनी याची माहिती नागपूर ‘एमएसएफ’चे सहसंचालक किशोर पाडवी यांना दिली. त्यांनी सुरक्षा पर्यवेक्षक संजय पाटमासे, जवान सागर एकोटखाणे व अंकुश खानझोडे यांना त्या बोगस डॉक्टरवर पाळत ठेवण्याचा सूचना दिल्या. ४ ऑक्टोबर रोजी तो बोगस डॉक्टर पुन्हा मेडिकलमध्ये आला. खानझोडे व एकोटखाने यांची नजर त्याच्यावर पडताच त्याला पकडून ‘एमएसएफ’च्या कार्यालयात आणले. त्याने रुग्णाच्या नातेवाईकाची लुबाडणूक केल्याचे लेखी लिहून दिले. सोबतच नातेवाईकाला पैसेही परत दिले. सुरक्षा रक्षकांनी रुग्णाच्या नातेवाईकाला बोगस डॉक्टरविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. परंतु सोबत इतर नातेवाईक नसल्याने महिलेने तक्रार करण्यास नकार दिला.

- सुरक्षा रक्षकाने सतर्क राहायला हवे

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, सुरक्षा रक्षकाने सतर्क राहिल्यास अशा अनेक घटनांना आळा बसू शकेल. ‘एमएसएफ’चा जवान अंकुश खानझोडे व सागर एकोटखाणे यांच्या सतर्कतेमुळे बोगस डॉक्टरला पकडण्यात यश आले. या दोघांचा मेडिकलतर्फे सत्कार केला जाईल, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.

Web Title: The bogus doctor who went into chucky medical,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.