IPLचा कमबॅक किंग कोण? कोटीला लाख 'भारी', अनुभवी खेळाडूंची जबदरस्त कामगिरी

IPL 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेक युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करत असतात. या मोठ्या व्यासपीठावर खेळून ते आपल्या क्रीडा कौशल्याने जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडतात.

अनेक युवा खेळाडू असे आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवली आहे. पण यंदाचा आयपीएल हंगाम काही अनुभवी भारतीय खेळाडूंसाठी अप्रतिम राहिला आहे.

या यादीत पहिल्या स्थानावरील नाव म्हणजे फिरकीपटू पियुष चावला. चावलाने आपल्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर चाहत्यांच्या मनात जागा केली. एवढेच नाही तर तो पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील कायम आहे.

पियुष चावलाने चेन्नईविरूद्धच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बळी घेतले. त्याने यंदाच्या हंगामात १० सामन्यांमध्ये एकूण १७ बळी घेतले आहेत.

खरं तर या अनुभवी खेळाडूवर कोणत्याच फ्रँचायझीने विश्वास दाखवला नव्हता. पण मुंबई इंडियन्सने २०२३च्या हंगामासाठी ५० लाख रूपयांच्या मूळ किमतीत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

याशिवाय अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा देखील जबरदस्त कामगिरी करत आहे. २०२२ या वर्षात त्याला एकही खरेदीदार मिळाला नव्हता. पण मिनी लिलावात लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला अन् ५० लाख रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले.

मोहित शर्माने देखील युवा खेळाडूंना लाजवेल अशी गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. मागील हंगामात तो नेट गोलंदाज होता, पण यंदा त्याला खेळण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करताना गुजरात टायटन्सच्या गोलंदाजाने ६ सामन्यांत ८ बळी घेतले. त्याला ५० लाखांत गुजरातने खरेदी केले होते.

याशिवाय इशांत शर्माचेही नाव या यादीत आहे. या हंगामात त्याने आपल्या अनुभवाने फलंदाजांना चीतपट केले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला यंदा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण सहाव्या सामन्यात विजय मिळवून दिल्लीने खाते उघडले. खरं तर त्या विजयाचा हिरो देखील इशांत शर्माच होता. त्याने ४ सामन्यांत ६ बळी घेतले आहेत.

मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे या पर्वात चमकदार कामगिरी करतो आहे. त्याने तीन अर्धशतके झळकावून 'टायगर जिंदा है' दाखवून दिले.

मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर त्याला केकेआरच्या फ्रँचायझीने रिलीज केले होते. त्यानंतर चेन्नईने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. रहाणे या हंगामात १८९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. त्याला चेन्नईच्या फ्रँचायझीने ५० लाखांत आपल्या संघात घेतले होते.