शोकाकूल वातावरणात संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

By Admin | Published: June 24, 2017 10:31 AM2017-06-24T10:31:12+5:302017-06-24T18:11:17+5:30

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर आज केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

The last message to Sandeep Jadhav in mourning atmosphere | शोकाकूल वातावरणात संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

शोकाकूल वातावरणात संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि. 24 - जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्या पार्थिवावर शनिवारी केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप जाधव यांच्या केळगाव या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात झाले. संदीप यांचा पार्थिवाला 12 वर्षांच्या पुतण्या सदाशिव, तीन वर्षाची मुलगी मोहिनी आणि एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र यांनी अग्नी दिला. संदीप जाधव यांच्या जाण्याने केळगावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांना अखेराचा निरोप दिला. 
 
 
संदीप यांच्या घराशेजारील शेतातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी लष्कराच्या वतीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून संदीप यांना मानवंदना देण्यात आली.  यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार , जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.  
 
शहीद जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावकरी हजर होते. संदीप जाधव अमर रहे, अशा घोषणा गावकऱ्यांकडून दिल्या गेल्या. तसंच पाकिस्तानने केलेल्या कृत्याचा निषेध केला गेला. पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.  
 
संदीप जाधव यांच्या वीरमरणाची बातमी गुरुवारी रात्री कळताच त्यांचं संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे. संदीप यांचे एक दिवसापूर्वीच आपल्या वडिलांशी बोलणं झालं होते. विशेष म्हणजे शनिवारी संदीपच्या मुलाचा वाढदिवस आहे. दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी रात्री संदीप जाधव यांचं पार्थिव औरंगाबादमध्ये दाखल झालं होतं. 
 
 
गुरूवारी जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानी बॉर्डर एक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात संदीप सर्जेराव जाधव शहीद झाले. संदीप जाधव शहीद झाल्याची बातमी सर्व टीव्ही चॅनल्सवर सुरु होती. ही बातमी केळगाववासियांसाहित सर्व राज्यातील जनतेने बघितली. परंतू संदीपच्या वडिलांशिवाय कुटुंबातील लोकांना रात्रभर ही माहिती कळुच दिली नाही. संदीप जाधवच्या वडीलांनी रात्री 9:30 ला टीव्ही सुरु केला आणि तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीने तिच्या वडीलाचे फ़ोटो बघितले आणि पप्पा म्हणून ओरडली, आजोबांनी लगेच टीव्ही बंद केला  आणि टीव्हीचं मुख्य कनेक्शन काढून टाकलं आणि छातीवर दगड ठेवून रात्रभर ही बातमी कुणालाच कळू दिली नाही.
 
मुलाच्या वाढदिवशी बापावर अंत्यसंस्कार 
संदीप जाधवचा मुलगा शिवेंद्रचा आज शनिवारी पहिला वाढदिवस आहे. गुरुवारी संदीप ला वीर मरण आले. शुक्रवारी तांत्रिक अडचणी मुळे संदीप चे प्रेत केळगावला येवू शकले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील केलगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे . आता वाढदिवस साजरा करावा की शहीद दिन साजरा करावा अशा द्वि धा मनस्थितित संदीपचा परिवार आहे. संदीप हा 2002 मध्ये सैन्यात भरती झाला होता. 15 वर्ष त्याची नोकरी झाली होती . अवघ्या दीड वर्षात तो सेवानिवृत्त होणार होता, पण नियतीला हे मान्य नव्हते . दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात संदीपला वीरमरण आले. संदीपचे मोठे भाऊ रविंद्र व वडील सर्जेराव हे शेती करतात. संदीपच्या पश्चात तीन वर्षाची मुलगी मोनिका व एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र तसेच पत्नी उज्वला आई वडील असा परिवार आहे.
 
कुटुंबातील लोकांना धक्का बसेल म्हणून ही बातमी लपवली असली तरी रात्रभर ते हे दुःख लपवून एकांतात रडत बसले होते. संपूर्ण केळगाव व परिसरातील लोक या घटनेमुळे स्तब्ध झाले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत संदीपच्या कुटुंबाला ही बातमी कळू नये यासाठी गावकऱ्यांनी नियोजन केले होते. मिडियाच्या लोकांनाही शुक्रवारी सकाळी 10 पर्यंत बाहेरच थांबविण्यात आले होते. सकाळी प्रशासनाचे अधिकारी ,पोलिस बघुन या घटणेचा उलगड़ा झाला. या घटनेमुळे केळगाव सहित सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
 

मी विधवा झाले पण......

पाकिस्तानच्या हल्ल्यात माझ्या पतीला वीरमरण आले. यामुळे माझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. मुलांच्या डोक्यावर छत राहिले नाही. माझ्यावर जे बेतले ते आणखी कुणावर बेतू नये यासाठी पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे आहे

- पत्नी उज्वला जाधव

एक दिवसांपूर्वी झाले होते अखेरचे बोलणे
संदीप जाधव यांनी बुधवारी आपल्या वडिलांना फोन करून कुटुबांच्या व्यक्तींची खुशाली विचारली होती. बाबा मी चांगला आहे तुम्ही कसे आहात . माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी बोर्डर वर असल्याणे येवू शकत नाही. पण तुम्ही मुलाचा वाढदिवस साजरा करा मी लवकरच येतो. असे बोलुन् संदीप ने फोन कट केला.
 
केळगाव येथील सेवानिवृत्त सैनिक 
केळगाव या गावातील अतापर्यन्त पंचवीस जवान हे देशसेवेसेत कार्यरत असून याची सुरुवात सन् 1982 सालापासून सुरु झाली.गावातील विलास कौतिक सुल्ताने यांनी 1982 साली सैन्यात दाखल होऊन ही सुरुवात केली.त्यानंतर विश्वनाथ खंडू शिंदे 1987,निवृत्ति परसराम मुळे 1988, भिकुलाल भालचंद्र बड़ोदे 1986,मानिकराव उत्तम गरुड़ 1996, गोकुळ हरी इवरे 1995,चिंधाराम रामदास निंभोरे 1984 ,रामदास भिकन मख 1989 या सनिकांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचुन सेवानिवृत्त झाले असले तरी मात्र गावातील युवकांना देशसेवेसाठी प्रव्रुत्त केले.व तब्बल पंचवीस युवक हे आज मिल्ट्री मध्ये देशसेवेसाठी आपले कर्तुत्व बजावत आहे.
 
 
 
सैन्यात कार्यरत असलेले गावातील जवान 
योगेश पोतदार,ज्ञानेश्वर मुळे,सोमनाथ विट्ठल कोल्हे,गजानन विश्वनाथ माखोडे,लक्ष्मण सुखदेव मुळे,कैलास तुकाराम मख,बबलू संजय जाधव,विकास जगन पवार,जगदीश भीमराव कोठाळकर, राजू भगवान डाखोरकर,समाधान साळुबा पगारे,दत्तू विश्वनाथ आदमाने,अमोल विश्वनाथ शिंदे यांच्यासह अजुन दहा ते बारां जवान सैन्यात सेवा बजावत आहे.
 
केळगाव येथील तिसरे जवान शहीद
यापुर्वी केळगाव येथील माधव नारायण गावंडे 8 जुलै 2003, कळुबा भावराव बनकर 27 फेब्रुवारी 2010 साली देशसेवा बजावत असताना शहीद झाले होते. तर 22 जून गुरुवार 2017 रोजी दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात प्रत्युत्तर देताना संदीप जाधव यांना वीरमरण आले.
 
 
 

Web Title: The last message to Sandeep Jadhav in mourning atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.