IND vs WI Series : चेतेश्वर पुजाराला बाहेर काढलं, पण नंबर ३ साठी पाच खेळाडूंमध्ये शर्यत लागली!

IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारताच्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराला बाहेर बसवण्यात आले. भारतीय संघ १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंडीज मालिकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे आणि या मालिकेपासून भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ स्पर्धेचा प्रवासही सुरू होणार आहे. पुजाराच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल, यासाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे आणि ५ नावं समोर येत आहेत.

01 / 06

यशस्वी जैस्वाल - आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा सदस्य यशस्वीचा फॉर्म सध्या जबरदस्त सुरू आहे. २१ वर्षीय फलंदाजाने इराणी चषक स्पर्धेत शेष भारताकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्ध २१३ आणि १४४ धावांची खेळी मार्च महिन्यात केली होती. WTC Final मध्ये तो भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणूनही गेला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहता त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते.

02 / 06

ऋतुराज गायकवाड - महाराष्ट्राच्या फलंदाजावर निवड समिती लक्ष ठेवून होतीच... २६ वर्षीय फलंदाजाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या वन डे संघातून पदार्पण केले आणि तिसऱ्या क्रमांकावर त्याने १९ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सकडून सलामीला खेळणाऱ्या ऋतुराजची तंत्रशुद्ध फलंदाजी कसोटीसाठी उपयुक्त आहे. त्याने २८ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सहा शतकं झळकावली आहेत.

03 / 06

अजिंक्य रहाणे - १५ महिन्यांपूर्वी कसोटी संघातून डच्चू दिला गेलेल्या अजिंक्यने WTC Final मधून पुन्हा कसोटी संघात स्थान पटकावले आणि विंडीज दौऱ्यावर त्याच्याकडे पुन्हा उप कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत असला तरी पुजाराच्या जागी अनुभवी खेळाडू म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो.

04 / 06

शुबमन गिल - कसोटी रोहित शर्मासह शुबमन सलामीला येतो आणि १६ कसोटीत २ शतकांसह त्याची सरासरी ३२.८९ अशी आहे. निवड समितीने दीर्घकालीन सलामीवीर म्हणून यशस्वी किंवा ऋतुराजचा विचार केला असेल तर शुबमनला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

05 / 06

विराट कोहली - भारताचा माजी कर्णधार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, परंतु २०१६ पर्यंत तो कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. त्यामुळे पुजाराच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज म्हणून विराटचाही विचार होऊ शकतो.

06 / 06

भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी