पंकजा मुंडेंचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष जैन यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:46 PM2021-07-30T17:46:27+5:302021-07-30T17:48:14+5:30

बँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून राज्यात एकूण 41 शाखा आहेत तर ठेवी 950 कोटीवर गेल्या आहेत. 

chairman of Vaidyanath Bank Ashok Jain resigns | पंकजा मुंडेंचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष जैन यांचा राजीनामा

पंकजा मुंडेंचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष जैन यांचा राजीनामा

googlenewsNext
ठळक मुद्दे वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.नवीन अध्यक्षपदासाठी विनोद सामत यांचे नाव चर्चेत 

परळी : राज्यातील सहकारी बँकेत नावलौकिक मिळविलेल्या येथील दि वैद्यनाथ अर्बन को -ऑप. बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या चेअरमन पदाचा गुरुवारी सायंकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा दिला आहे. दहा वर्षापासून ते बँकेचे अध्यक्ष होते. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील व्यापारी, बँकेचे संस्थापक अध्यक्ष रतिलाल मोमया यांनी व्यापाऱ्यांना एकत्रित करून  वैद्यनाथ अर्बन बँकेची 1966 मध्ये स्थापना केली. त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे, अशोक सामत यांचे  कुशल नेतृत्व या बँकेस लाभले. बँकेचा शाखा विस्तार मराठवाड्यासह राज्यात  झाला. सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व  खासदार व बँकेच्या संचालक प्रीतम मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेची दमदार प्रगती चालू आहे. बँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून राज्यात एकूण 41 शाखा आहेत तर ठेवी 950 कोटीवर गेल्या आहेत. 

गेल्या अनेक वर्षापासून ही बँक भाजपच्या ताब्यात आहे. मुंडे परिवाराचे विश्वासू  अशोक जैन यांनी  11 जुलै रोजी 2011 रोजी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती. अशोक जैन यांच्या चेअरमन पदाच्या काळात बँकेचा शाखा विस्तार झाला व  बँकेच्या ठेवी  950 कोटीपर्यंत गेल्या. वैद्यनाथ बँक प्रगतीकडे वाटचाल करीत असताना काहीजणांनी बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जैन यांनी राजीनामा सादर केला. त्यानंतर बँकेच्या मार्गदर्शक पंकजा मुंडे यांची त्यांनी भेट घेतली. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदासाठी विनोद सामत यांचे नाव चर्चेत 
अशोक जैन यांच्या राजीनाम्यानंतर  वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बँकेच्या अध्यक्षपदासाठी विनोद अशोक सामत यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे विनोद सामत हे सध्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत व बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सामत  यांचे पुत्र आहेत .

बँकेच्या हितासाठी काम करत राहणार
आपण वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दहा वर्षात सर्वांचे सहकार्य लाभले आहे. सर्व संचालकांनी वेळीवेळी सहकार्य केले. खातेदार ,सभासद यांनी विश्वास टाकल्यामुळे बँकेची प्रगती करू शकलो. यापुढेही आपण बँकेच्या हितासाठी काम करणार आहे. - अशोक जैन

Web Title: chairman of Vaidyanath Bank Ashok Jain resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.