औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:03 PM2020-01-17T13:03:53+5:302020-01-17T13:06:47+5:30

एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल

Aurangabad's 1496 pollution generated companies on the radar of 'MIDC' | औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर

औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर

googlenewsNext
ठळक मुद्देउत्सर्जन कमी कराअन्यथा विस्तारालाही संमती नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील १,४९६ कंपन्या प्रचंड प्रदूषण पसरवीत असल्याचे समोर आले असून, या कंपन्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रडारवर आल्या आहेत. एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल, असे म्हटले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जारी केलेल्या देशातील १00 अतिप्रदूषित क्षेत्रांच्या (एरिया) २0१७-१८ च्या यादीत औरंगाबाद अतिप्रदूषित (सीव्हिअरली पोल्युटेड) श्रेणीत येते. सर्वंकष ‘पर्यावरण प्रदूषण निर्देशांका’त (सीईपीआय) औरंगाबादला ६९.८५ गुण मिळाले आहेत. प्रदूषणाची तीव्र पातळी हे गुण दर्शवितात. औरंगाबादेतील १,४९६ कंपन्या लाल (६0पेक्षा अधिक गुण) आणि नारंगी (४१पेक्षा अधिक गुण) श्रेणीत येतात, असे एमआयडीसीच्या परिपत्रकात म्हटले आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले की, २ जानेवारी रोजी एमआयडीसीच्या सीईओंनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लाल व  नारंगी श्रेणीतील कंपन्यांचा विस्तार निगराणीखाली आहे. या कंपन्यांना विस्तार करायचा असल्यास नियमांचे पालन करावे लागेल. प्रदूषणाची पातळी खाली आणावी लागेल.

औरंगाबादेतील ४,७६५ कंपन्यांवर प्रदूषण विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात येते. त्यातील एकूण १,४९६ कंपन्या तीव्र प्रदूषण करणाऱ्या आहेत. त्यांना लाल व नारंगी रंगाची श्रेणी देण्यात आली आहे. ८६७ कंपन्या लाल श्रेणीत, तर ६२९ कंपन्या नारंगी श्रेणीत आहेत. ३,२३४ कंपन्या हरित श्रेणीत (सीईपीआय गुण २१ ते ४0) आणि ३५ कंपन्या शुभ्र श्रेणीत (सीईपीआय गुण २0च्या आत) येतात. हरित आणि शुभ्र श्रेणी प्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांची समजली जाते.‘मराठवाडा एन्व्हायरन्मेंटल केअर क्लस्टर’चे (एमईसीसी) संस्थापक अध्यक्ष आणि स्थानिक उद्योजक बी. एस. खोसे यांनी सांगितले की, ज्या कंपन्या प्रदूषण करीत आहेत, त्यांना शोधून दंड करायला हवा. ज्या कंपन्या प्रदूषण करीत नाहीत, त्यांना जबाबदार धरता कामा नये.

सूचनांची अंमलबजावणी करीत आहोत :
‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर’चे (सीएमआयए) उपाध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, या समस्येबाबत सरकारी संस्थांकडून आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. औरंगाबादेतील कंपन्या त्यावर काम करीत आहेत.

महाराष्ट्रात नऊ क्षेत्रे अतिप्रदूषित
एमआयडीसीच्या परिपत्रकानुसार, देशातील १00 अतिप्रदूषित क्षेत्रांच्या यादीत नऊ क्षेत्रे महाराष्ट्रातील आहेत. 

ही नऊ क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत :
तारापूर (सीईपीआय गुण ९३.६९)
चंद्रपूर (सीईपीआय गुण ७६.४१)
औरंगाबाद  (सीईपीआय गुण ६९.८५)
डोंबिवली (सीईपीआय गुण ६९.६७)
नाशिक (सीईपीआय गुण ६९.४९)
नवी मुंबई (सीईपीआय गुण ६६.३२)
चेंबूर (सीईपीआय गुण ५४.६७)
पिंपरी-चिंचवड (सीईपीआय गुण ५२.१५)
महाड (सीईपीआय गुण ४७.१२)

Web Title: Aurangabad's 1496 pollution generated companies on the radar of 'MIDC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.