नांदेड-वाघाळा मनपाच्या नऊ लिपिकांना खंडपीठाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:25 PM2020-02-26T12:25:20+5:302020-02-26T12:27:05+5:30

‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे.

Nanded-Waghala Municipal Clerk Receives relief from Aurangabad Bench | नांदेड-वाघाळा मनपाच्या नऊ लिपिकांना खंडपीठाचा दिलासा

नांदेड-वाघाळा मनपाच्या नऊ लिपिकांना खंडपीठाचा दिलासा

googlenewsNext

औरंगाबाद : लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लिपिक पदावर नियुक्त्या दिलेले नांदेड-वाघाळा मनपाच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना पदावनत करून सफाई कर्मचारी पदावर नियुक्ती देण्याच्या आदेशाबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे.

नांदेड-वाघाळा महापालिकेने लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना २०१० मध्ये लिपिक पदावर नियुक्ती दिली होती. यात साहेबराव विठ्ठल जोंधळे, महेश चंद्रमोहन जोंधळे, रेखा पुंडलिकराव गजभारे, किशन अर्जुनराव वाघमारे, राहुल यादव कांबळे, अर्चना दत्ता जोंधळे, नितीन झरिबा कांबळे, भगवान गंगाराम जोंधळे, राजू कचरू करडे आदींची वर्ग ३ लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणी महापालिकेत कार्यरत सुमेध भगवानराव बनसोडे यांनी २०१० मध्ये मुख्यमंत्र्यांकडे केली होती. चौकशी न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. यासंबंधी एक सदस्यीय चौकशी समिती नेमून आयुक्तांनी नगर विकास विभागाच्या उपसचिवांना अहवाल सादर केला होता. पुन्हा तक्रारदार बनसोडे यांनी २६ जानेवारी २०२० रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 

तक्रारीच्या अनुषंगाने उचित कारवाई शासन स्तरावर प्रस्तावित असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले. यामुळे  बनसोडे यांनी आत्मदहन केले नाही. नगरविकास विभागाने २८ जानेवारी २०२० रोजी ९ लिपिकांसंबंधी एक आदेश जारी केला. या आदेशाला लिपिकांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी  शासन निर्णय पारित केले आहेत. सुनावणीअंती खंडपीठाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. अ‍ॅड. थोरात यांना अ‍ॅड. ओम तोटावाड यांनी साहाय्य केले.

Web Title: Nanded-Waghala Municipal Clerk Receives relief from Aurangabad Bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.