वातावरण बदलामुळे तुरीच्या झाल्या तुराट्या, शेतकऱ्यांवर ओढवले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 05:26 PM2021-11-30T17:26:00+5:302021-11-30T18:18:46+5:30

सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येत आहे.

tur crop affected due to weather changes | वातावरण बदलामुळे तुरीच्या झाल्या तुराट्या, शेतकऱ्यांवर ओढवले संकट

वातावरण बदलामुळे तुरीच्या झाल्या तुराट्या, शेतकऱ्यांवर ओढवले संकट

googlenewsNext
ठळक मुद्देउभी पिके लागली वाळू :  गावगाड्यात चर्चा

वर्धा : वातावरणात झालेल्या बदलामुळे उभे तूर पीक वाळू लागल्याने तुरीच्या तुराट्या झाल्या हो...अशीच चर्चा आता गावोगाव खेड्यात होताना दिसून येत आहे.

बोंडअळी व बोंडसडमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. कपाशीचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तरी भाव बरे मिळत असल्याने काही प्रमाणात तोटा भरून निघाला. तुरीचे उत्पन्न फायद्याचे होईल, अशी शेतकऱ्याला आशा होती. मात्र, सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येते. यावर नेमकी काय उपाययोजना करावी, याची शेतकऱ्याला माहिती नाही. तुरीचे पीक खर्च केल्यानंतर हातचे जाईल या भीतीने शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत दिसून येत आहे.

शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी असलेला कृषी विभागही याकडे कानाडोळा करीत असून विभागालाही नेमकी जिल्ह्याची स्थिती माहीत नसल्याचे दिसून येते. एका कृषी सहायकावर दहा दहा गावांचा भार असल्याने तेसुद्धा एका गावाला न्याय देऊ शकत नाहीत. शेतकऱ्याला या अस्मानी संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे.

चार दिवसांपूर्वी तूर चांगली होती. चांगला फुलोराही होता, काही शेंगादेखील पकडल्या होत्या. परंतु, अचानक काही झाडं वाळायला सुरुवात झाली व दोन दिवसांत लॉट सुकलेला दिसत आहे. काय उपाययोजना करावी कळत नाही.

-सुरेश इखार, पवनार.

वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे तूर सुकताना दिसत आहे. हा रोग पसरू नये म्हणून एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची ताबडतोब ड्रेचिंग करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सदर उपाययोजना करावी.

-परमेश्वर घायतिडक, तालुका कृषी अधिकारी.

Web Title: tur crop affected due to weather changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.