गुगल स्वत:च तुमच्या फोटोंना ‘नाव’ कसे ठेवते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 07:51 AM2022-05-21T07:51:25+5:302022-05-21T07:52:02+5:30

गुगलच्या गहनमतीला पुरविलेल्या विदेमध्ये जे कळत-नकळत पेरले जाते, त्यातूनच प्रतिमा परिचयाच्या आज्ञावलीचे झाड उगवते... त्यावरून झालेल्या घोळाची कथा!

how does google automatically name your photos | गुगल स्वत:च तुमच्या फोटोंना ‘नाव’ कसे ठेवते?

गुगल स्वत:च तुमच्या फोटोंना ‘नाव’ कसे ठेवते?

googlenewsNext

- विश्राम ढोले

कल्पना करा. तुम्हा मित्र-मैत्रिणींची एक पार्टी झालीय. तुम्ही त्यात लई फोटोबाजी केलीय. लगोलग सारे गुगल फोटोजवर चढवूनही टाकले. दुसऱ्या दिवशी पार्टीचे फोटो बघावे म्हणून तुम्ही सहज गुगल फोटोज उघडता आणि बघता तर काय... तुमच्या काही फोटोंना गुगलच्या ॲपने स्वतःहूनच कॅप्शन दिलीय... गोरिला ! आता हे खरंय, की तुम्ही आणि तुमचे मित्र काळेसावळे आहात. पण म्हणून काय, थेट गो-रि-ला?? फोटोंना गुगलने स्वतःहून नाव दिले, त्यातले काही बरोबरही आले, म्हणून गुगलचे कौतुक करायचे, की रंगरूपावरून आपल्याला गोरिला म्हटल्याबद्दल खटला टाकायचा? 

आज हा प्रसंग फक्त काल्पनिकच वाटू शकतो. पण २०१५ साली जॅकी आल्सिने या अमेरिकी कृष्णवर्णीय तरुणावर तो प्रत्यक्ष गुदरला होता. गुगल फोटोज ॲप तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं. फोटोतील चेहरे, वस्तू व संदर्भ बघून फोटोला स्वतःहून नाव किंवा टॅग देण्याची एक भन्नाट सुविधा या ॲपमध्ये होती. जॅकीच्या एका मित्राने या ॲपवरून त्याला त्यांचे काही फोटो पाठवले. त्याने ते उघडून पाहिले, तर त्या फोटोंची गुगलने स्वतःहूनच छानपैकी वर्गवारी केली होती. त्यानुसार त्या गठ्ठ्यांना साजेसे नाव दिले होते. त्याच्या भावाच्या पदवीप्रदान सोहळ्यातील ती झगा-पगडीतली छायाचित्रे पाहून ॲपने त्यांना नाव दिले होते... ग्रॅज्युएशन. ॲपची ही हुशारी पाहून वेब डिझायनर असलेला जॅकी प्रभावितही झाला, पण क्षणभरापुरताच. कारण नंतरच्या एका फोटोगठ्ठ्याला (फोल्डर) ॲपने नाव दिले होते... गोरिला आणि त्यात होते ते त्याचे आणि त्याच्या कृष्णवर्णीय मित्राचे फोटो ! जॅकी जागीच थिजला. 

पहिले तर त्याला वाटले, त्यानेच काहीतरी चुकीचे शोधले किंवा क्लिक केले. पण तसे नव्हते. चिडलेल्या जॅकीने ट्वीटरवर धाव घेतली. त्याच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला आणि गुगलला शिव्या घातल्या. दोन तासात गुगलने आपली चूक मान्य केली आणि जॅकीची माफी मागितली. इतकेच नव्हे, तर ॲपच्या बुद्धीने कुठे माती खाल्ली, याचा शोधही सुरू केला. गुगल फोटोच्या आज्ञाप्रणालीत बदल केला. त्यामुळे दुसऱ्या दिवसापर्यंत जॅकीच्या एकूण फोटोंपैकी फक्त दोन फोटोंची चुकीची नावे शिल्लक राहिली. 

या घोळामुळे गुगलची तेव्हा इतकी नाचक्की झाली की, गुगलने नंतर गोरिला नावाचे खूणनाम (टॅग) फोटो ॲपवरून काढूनच टाकले. कोणी तसे दिले तरी मानवी हस्तक्षेपाद्वारे ते काढून टाकले जाते. त्यामुळे गुगल फोटोजमध्ये खऱ्या गोरिलाच्या फोटोंच्या गठ्ठ्यांनाही गोरिलाप्रकरणी गूगल फोटोजने केलेल्या गाढवपणाचे खापर गुगलच्या गहनमतीवर अर्थात डीप लर्निंगवर फोडले गेले. एक तर तिने माणसांना गोरिलाच्या कप्प्यात टाकून चूक केली होती आणि त्या चुकीचे मूळ आज्ञावलीत कुठे होते, हे ती गूढमती काही सांगू देत नव्हती, असेच बहुतेकांना वाटत होते. पण ते काही खरे नव्हते. 

प्रतिमा परिचय तंत्र अर्थात इमेज रिकग्निशन टेक्निक हे खरं तर मागच्या लेखात जिचा उल्लेख आला, त्या गहनमतीचे पहिले मोठे यश. प्रतिमांचे विश्लेषण करून त्यांना योग्य नाव देण्याची क्षमता हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा. गुगल ॲपच्या आधी त्यावर बरेच संशोधन आणि सुधारणाही झालेल्या होत्या. इतर बऱ्याच बाबतीत या तंत्राचे यश उल्लेखनीय होते. म्हणूनच गोरिलाप्रकरणी केलेल्या चुकीचे मूळ दुसरीकडे कुठे तरी शोधावे लागणार होते. बेव डिझायनर असलेल्या आणि मशीन लर्निंगशी परिचय असलेल्या जॅकीला चुकीचे मूळ कुठे ते कळले होते. ते गहनमतीच्या बुद्धीत नव्हते. ते गहनमतीच्या शिकवणीसाठी वापरलेल्या विदेत म्हणजे डेटात होते.

यांत्रिक बुद्धीतील गहनमती प्रकारातल्या स्वयंशिक्षणामध्ये शिकताना कोणती विदा वापरली याला फार महत्त्व असते. कारण या विदेतल्या वृत्ती-प्रवृत्ती (पॅटर्न्स) शोधतच गहनमती शिकते, आडाखे बांधते आणि नियम पक्के करते. म्हणून मूळ विदेतच ज्या खोलवरच्या वृत्ती-प्रवृत्ती रुजल्या असतात, त्याच गहनमतीमध्ये नियम बनून उगवतात. पेरले तसे उगवते, त्यासारखेच हे. गुगलच्या गहनमतीला पुरविलेल्या छायाचित्रांच्या विदेमध्ये जे कळत-नकळत पेरले गेले होते. त्यातूनच प्रतिमा परिचयाच्या आज्ञावलीचे झाड उगवले होते. त्याला माणसाला गोरिला म्हणणारे विकृत फळ येत असेल, तर तो दोष आज्ञावलीचा नाही, विदेचा होता.

नेमका काय होता हा दोष? कुठून उपटला होता? त्याची वर्णद्वेषी विषारी फळे अजून कोणाला चाखावी लागली? त्यातून विदाबुद्धीच्या क्षेत्रात एक वेगळी सामाजिक-संगणकीय चळवळ कशी उभी राहिली, हा एक ताजा, सुरस आणि दृष्टिगर्भ इतिहास आहे. पुढचा लेख त्यावरच असेल. vishramdhole@gmail.com

Web Title: how does google automatically name your photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल