कौशल्य आधारित शिक्षणासाठी Infosys सोबत सांमजस्य करार, उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:49 PM2021-11-30T16:49:56+5:302021-11-30T16:50:32+5:30

Uday Samant : मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला.

Memorandum of Understanding with Infosys for Skills Based Education, Information of Uday Samant | कौशल्य आधारित शिक्षणासाठी Infosys सोबत सांमजस्य करार, उदय सामंत यांची माहिती

कौशल्य आधारित शिक्षणासाठी Infosys सोबत सांमजस्य करार, उदय सामंत यांची माहिती

Next

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी उच्च  व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, इन्फोसिसचे तिरूमला आरोही, संतोष अंनदापुर, किरण एम. जी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचे पाऊल टाकले आहे. देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करत आहे. यामुळे जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक (formal) अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत, असे सामंत म्हणाले.

पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस असणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

या सामजंस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख  विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत 3 हजार  महाविद्यालयातील 30 लाख  विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे. त्यांना इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या मंचावर उपलब्ध असलेले 3 हजार 900 पेक्षा अधिक कोर्सेस अभ्यासासाठी उपलब्ध होतील आणि सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देखील प्राप्त होईल. तसेच इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिट्युटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही सामंत यावेळी सांगितले.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये :
या मंचावरील कृती प्रवण ( Learn By Doing ) अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी या कोर्सेसची  विद्यार्थ्यांना मदत होईल.

- अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस, प्रकल्प व्यवस्थापन, संभाषण कौशल्ये इत्यादी व्यवसायाभिमुख कौशल्ये प्राप्त करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील.

- उच्च शिक्षण संस्थामधील शिक्षक वर्गाला या मंचावर उपलब्ध सर्व कोर्सेस वापरता येतील.

- उपक्रमाअंतर्गत डिजीटल किंवा आभासी पद्धतीच्या वर्ग खोल्या तयार करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम संस्था करु शकतील. तसेच याद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

- स्प्रिंगबोर्ड मंचावर उपलब्ध कोर्सेस विद्यार्थ्याकरिता वैकल्पिक कोर्सेस म्हणून शिकविता येतील व त्यासाठी शिक्षक वर्ग त्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाचे संचालन करतील.

- महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्था जे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण वर्ग राबविणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले डिजीटल कंटेट तयार करणे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम तयार करणे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याचे तंत्र इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देखील इन्फोसिस कंपनीच्या विषय तज्ञामार्फत दिले जाईल.

- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी आणि शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थांसाठी खास करून तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधासोबतच प्रोजेक्ट इंटनशिप बद्दलची सुविधा आणि एलएमएसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. प्रोजेक्ट इंटर्नशिप आणि व्यवसायिक कौशल्य वाढविणाऱ्या कोर्सेसमुळे या दोन्ही संस्थांतील विद्यार्थी रोजगारक्षम होण्यास मदत होईल.

Web Title: Memorandum of Understanding with Infosys for Skills Based Education, Information of Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.