'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये

By संतोष भिसे | Published: June 9, 2023 01:11 PM2023-06-09T13:11:10+5:302023-06-09T13:11:51+5:30

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Railway Board in action mode after Balasore train accident, Trains may be delayed, but the track must be safe | 'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये

संग्रहित छाया

googlenewsNext

सांगली : बालासोर रेल्वेअपघातानंतररेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये आले आहे. प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे रेल्वे प्रशासन २६ आठवड्यांचा कृती आराखडा तयार करीत आहे.

रुळांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी न राहण्याच्या सूचना देशातील सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विभागाला ब्लॉक घेणे आवश्यक असेल तर त्यांना तो आपत्कालीन परिस्थितीनुसार देण्याची सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. बालासोर रेल्वे अपघातानंतर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.

गुरुवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग यांनी सिग्नलिंग आणि टेलिकॉम, टीआरडी विभागाच्या अधिकाऱ्यांची व अभियंत्याची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी सुरक्षेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. ऐनवेळी ब्लॉक घ्यावे लागले तरी चालेल, गाड्यांना थोडा उशीर झाला तरीही चालेल, पण प्रवासी सुरक्षितता महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत गाड्या मॅन्युअली जाणार नाहीत. इंटरलॉकिंगचे काम पूर्ण होईपर्यंत गाड्या धावणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पुण्यासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कार्यालयात बसून न राहता स्थानकात, यार्डामध्ये जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातील अधिकारी स्थानकामध्ये परीक्षण करताना दिसून येत आहेत. गुरुवारी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे रेल्वेत प्रवाशांची तिकिटे व सामान तपासात होते, तर सहायक परिचालन व्यवस्थापक सचिन पाटील यार्डात जाऊन मालगाडीला इंजिन व वॅगन जोडण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते.


बालासोरसारखा अपघात पुणे विभागात व देशात पुन्हा होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. प्रवासी सुरक्षेशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यावर भर दिला जात आहे. - बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

Web Title: Railway Board in action mode after Balasore train accident, Trains may be delayed, but the track must be safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.