... जेव्हा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका महाजनच्या २ महागड्या रॅकेट हरवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 01:24 PM2021-08-28T13:24:12+5:302021-08-28T13:24:46+5:30

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तपासाची सूत्रं वेगानं फिरली आणि अवघ्या एका तासात हरवलेली रॅकेट परत मिळाली.

... when international tennis player Radhika Mahajan loses 2 expensive rackets | ... जेव्हा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका महाजनच्या २ महागड्या रॅकेट हरवतात

... जेव्हा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका महाजनच्या २ महागड्या रॅकेट हरवतात

googlenewsNext

पुणे : अनेक राष्ट्रीय टेनिस स्पर्धा, ज्यु. आशियाई मानांकन  स्पर्धेतील विजेती आणि देशातील सर्वोच्च नामांकन पटविलेली आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका राजेश महाजन हिच्या काही दिवसांपूर्वी रिक्षातून प्रवास करताना २ महागड्या रॅकेट हरविल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या. त्यानंतर तासाभराच्या प्रयत्नानंतर गुन्हे शाखेने जिल्हाधिकारी कार्यालय ते नवी पेठेतील राजेंद्रनगरपर्यंतचे सर्व सीसीटीव्हींची तपासणी करुन तिच्या हरविलेल्या दोन्ही रॅकेट परत मिळवून दिल्या. यामुळे राधिका आता हैदराबाद येथील एका स्पर्धेत आपल्या रॅकेटसह सहभागी होऊ शकणार आहे. 

राधिका महाजन (वय १७) ही राष्ट्रीय टेनिस विजेती, ज्यु़ आशियाई मानांकन स्पर्धेतील विजेती असून टेनिसमध्ये तिला देशातील सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. ती चैन्नई येथील स्पर्धेत सहभागी होऊन २२ ऑगस्ट रोजी पुण्यात परत आली.  एअरपोर्टवरुन तिचे वडिल बसने तिला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन आले. तेथून ते रिक्षाने राजेंद्रनगर येथील घरी गेले होते. घरी आल्यावर राधिकाच्या २ महागड्या रॅकेट या रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी घराजवळील सर्व सीसीटीव्ही तपासले. पण त्यात रिक्षा नंबर मिळू शकला नाही. ज्या रॅकेटने आपण अनेक स्पर्धा जिंकल्या, त्या रॅकेट हरविल्याने राधिका रात्रभर रडली. रॅकेट महागड्या असल्याने त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडेही तक्रार दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची महाजन यांनी भेट घेऊन परिस्थिती सांगितली.

पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना त्वरीत तपास करण्याची सूचना दिली. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस शिपाई विशाल दळवी व त्यांच्या सहकार्‍यांनी तपास सुरु केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून राजेंद्रनगर येथील त्यांच्या घरापर्यंतचे रिक्षा ज्या मार्गाने गेली. त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यात एका ठिकाणी रिक्षाचा क्रमांक कॅमेर्‍याने टिपला होता. त्यावरुन त्यांनी रिक्षाचालकाचा नाव, पत्ता शोधला. रिक्षाचालकाला विचारल्यावर त्याने रिक्षामध्ये दोन रॅकेट सापडल्या असून त्या घरी ठेवल्याचे सांगितले. रिक्षाचालकाकडून पोलिसांनी दोन्ही रॅकेट परत मिळविल्या. रॅकेट सापडल्याचे पाहून राधिकाच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. राधिकाचे वडिल राजेश महाजन पुन्हा पोलीस आयुक्तालयात आले व त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,  रॅकेट मिळवून देणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस शिपाई विशाल दळवी व सहकार्‍यांचे आभार मानले.

Web Title: ... when international tennis player Radhika Mahajan loses 2 expensive rackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.