ठाणे महापालिकेचे चार अभियंता निलंबित; पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:40 PM2021-09-25T16:40:36+5:302021-09-25T16:41:11+5:30

Thane Municipal Corporation : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्वतः रस्त्यावर उतरून ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली होती.

Four Thane Municipal Corporation engineers suspended; Action after Guardian Minister's visit | ठाणे महापालिकेचे चार अभियंता निलंबित; पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कारवाई

ठाणे महापालिकेचे चार अभियंता निलंबित; पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कारवाई

Next

ठाणे : ठाण्यातील खड्डे मुक्तीसाठी स्वतः रस्त्यावर उतरलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले. यानंतर पालिका आयुक्तांनी सुद्धा तात्काळ कारवाई करत पालिकेच्या चार अभियंत्यांना निलंबित केले आहे. चेतन पटेल, प्रकाश खडतरे, संदीप सावंत आणि संदीप गायकवाड अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे. खड्डे भरणे तसेच  कामाच्या गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्याने या चार अभियंत्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्वतः रस्त्यावर उतरून ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली होती. यावेळी केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आणि अभियंता देखील उपस्थित होते. आनंदनगर पासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करताना पालकमंत्र्यांनी सुरुवातीलच ठाणे पालिका आणि इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, पैसे देऊनही कामे होत नाही त्यामुळे सरकारचे नाव खराब होत असून कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा सज्जड दमच पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला होता. कामांमध्ये आणि गुणवत्तेमध्ये दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना दिले होते. 

डॉ. विपीन शर्मा यांनी देखील दौऱ्याच्या दुसऱ्या  दिवशीच शनिवारी चार शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता चेतन पटेल,प्रकाश खडतरे कनिष्ठ अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड या अभियंत्यांचा समावेश आहे. प्रकाश खडतरे  हे वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत असून  चेतन पटेल हे उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. तर संदीप सावंत आणि संदीप गायकवाड हे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. संदीप सावंत यांच्या अखत्यारीत पालकमंत्र्यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोड येत असून या सर्व अभियंत्यांवर कामात आणि गुणवत्ते बाबत दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

ठेकेदारांनाही नोटिसा काढण्याच्या कामाला सुरुवात... 
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी जाऊन स्वतः केलेल्या कामाची गुणवत्ता तपासली होती. त्यानंतर कामात गुणवत्ता नसलेल्या ठेकेदारांना देखील ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले होते. ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता ठेकेदारांनाही नोटिसा काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

इतर प्राधिक्कारणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा ?
ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले उड्डाणपूल हे एमएसआरडीसीच्या अंतर्गत येत असून या उड्डाणपुलावर देखील खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात इतर प्राधिकरणाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली असली तरी इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: Four Thane Municipal Corporation engineers suspended; Action after Guardian Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.