'ताई, आई-वडिलांची काळजी घे...'; सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:03 PM2022-06-29T13:03:19+5:302022-06-29T13:03:44+5:30

काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला असून संतोषला ८४ टक्के गुण मिळाले होते.

'Tai, take care of our parents ...'; Student preparing for CET commits suicide | 'ताई, आई-वडिलांची काळजी घे...'; सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

'ताई, आई-वडिलांची काळजी घे...'; सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext

नांदेड: शहरात शिकण्यासाठी आलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जून रोजी दुपारी नांदेडच्या उदयनगर येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. संतोष गंगाधर राऊळ असे मृत मुलाचे नाव आहे. 

शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उदयनगर येथे साईप्रसाद या इमारतीत मानवत येथील संतोष गंगाधर राऊळ (वय १७) हा विद्यार्थी भाड्याने राहत होता. तो अभ्यासात हुशार होता, काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला असून संतोषला ८४ टक्के गुण मिळाले होते. तर दहावीत तो ९४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. दरम्यान, नांदेडात खासगी शिकवणीसाठी तो रूम घेऊन राहत होता. अभ्यासाच्या ताण-तणावातून संतोषने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, नेमके कारण समजू शकलेले नाही.

सोमवारी सकाळी संतोष आपल्या मित्रांसाेबत चहा घ्यायला गेला होता. रूमवर परतल्यानंतर काही वेळाने याच इमारतीत राहणाऱ्या संतोषच्या मित्राने ११ वाजता दार वाजवून त्याला आवाज दिला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राने खिडकीतून पाहिले असता त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. त्यानंतर इतर मित्र आणि घरमालकांना ही माहिती दिली. दरम्यान, पोलिसांना कळविल्याने भाग्यनगर ठाण्यातील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. संतोषच्या पालकांना मानवत येथून पाचारण करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी सांगितले.

ताई आई-वडिलांची काळजी घे...
संतोषने आत्महत्येपूर्वी इंग्रजीमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात बहिणीला आई-वडिलांची शेवटपर्यंत काळजी घे, अशी भावनिक साद संतोषने घातली आहे. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या आई-वडिलांनी संतोषचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला.

Web Title: 'Tai, take care of our parents ...'; Student preparing for CET commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.