CM टू PM, लता मंगेशकर ते सचिन तेंडुलकर, बाबासाहेबांच्या निधनाने शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 11:50 AM2021-11-15T11:50:11+5:302021-11-15T12:03:04+5:30

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

बाबासाहेबांनी आज सकाळी 5.07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी, दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासन ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत दिग्गजांनी शोक व्यक्त केला.

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Padma Vibhushan Shiv Shahir Babasaheb Purandare) यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी ज्यांनी शेकडो व्याख्याने दिली आणि या संबंधीची आस्था तरुणांच्या मनात निर्माण करण्याची ज्यांनी काळजी घेतली, असे योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटलंय.

आम्हा सर्व मंगेशकरांचे बाबासाहेबांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.अगदी अलिकडेच माझे त्यांचे बोलणे झाले होते आणि त्यांनी मला खुप आशिर्वाद दिले होते. या पितृतुल्य व्यक्तित्वाला माझा त्रिवार मुजरा आणि विनम्र श्रद्धांजली, असे लता मंगेशकर यांनी म्हटलंय.

लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे.

त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील, असं मोदींनी म्हटलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राज यांनी आज पुण्यात जाऊन बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले