अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:18 PM2021-06-26T12:18:32+5:302021-06-26T12:20:05+5:30

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले आहेत. ‘समाजसेवा’ या गोंडस नावाच्या आवरणाखाली त्यांचा हा उद्योग चालतो.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Dhandewaika; Allegation of Kautikrao Thale Patil | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांच्यावर ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर नाराजीनाशिक येथील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, याविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही.

- राम शिनगारे

औरंगाबाद : अलीकडील काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वापर काही लोक स्वत:चा फायदा, धंदा किंवा विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी करीत असल्याचा खळबळजनक आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. ९४ वे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यासाठी आग्रही असलेल्या पुण्यातील एका संस्थेने सुरुवातीला दबाव टाकला. त्याला महामंडळ बळी पडत नाही, असे दिसताच फोनवर पाहून घेण्याची दोन वेळा धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासाही ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिकात केला आहे.

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले आहेत. ‘समाजसेवा’ या गोंडस नावाच्या आवरणाखाली त्यांचा हा उद्योग चालतो. या उद्योगात राजकीय नेत्यांचा ‘राजरोस’ उपयोग करून घेता येतो. किंबहुना तेवढ्यासाठीच शक्यतो परक्या मुलखात साहित्य संमेलनाचा घाट घातला जातो. अशा संमेलनाची इमारत पूर्णपणे ‘अस्मिते’च्या आणि ‘स्वाभिमाना’च्या भावनिक मुद्यांवर उभी केलेली असते. अशी इमारत उभी राहू द्यायची की नाही, हे साहित्य महामंडळाच्या निर्णयावर अवलंबून असते. संत नामदेवांच्या नावाखाली पंजाबमध्ये घुमानला सात वर्षांपूर्वी झालेले संमेलन महाराष्ट्रातून माणसे नेऊन साजरे केले. ज्या गावात संमेलन झाले त्या गावात एकही मराठी माणूस नसताना निव्वळ पर्यटनासाठी आणि तेथे डझनभर केंद्रीय, दोन्ही राज्यांचे मंत्री जमवून कौतुक सोहळा करून घेतला होता. त्या संमेलनालाही माझा व्यक्तिश: विरोध होता. तेव्हा संमेलनाला विरोध म्हणजे संत नामदेवांना विरोध, असा भावनिक मुद्दा पुढे आला. तेव्हा माघार घ्यावी लागली. मात्र आपल्या कार्यकाळात अशा गोष्टींना बळी न पडण्याचा निश्चय केला होता.

९४ वे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यासाठी पुण्यातील एका संस्थेने निमंत्रण दिले होते. त्या संस्थेला संमेलन महाराष्ट्रदिनी भरवून हीरक महोत्सव साजरा करायचा होता. यातून मराठी माणसाचा आवाज उत्तर भारतीय आणि दिल्लीकरांना दाखवायचा, तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांना करून दिल्लीत त्यांना ‘मोठे’ करायचे होते. यासाठी त्या संस्थेचे अध्यक्ष वारंवार फोनवर काय काय सांगत होते. त्यासाठी कोणाकोणाची नावे फोनवर घेत होते. विठ्ठल मणियार हे कोण व कुठले माहिती नसताना त्यांचे सतत नाव घेतले जात होते. यासाठी विविध प्रसारमाध्यमांतून बातम्याही पेरण्यात येत होत्या. शरद पवार यांच्या नावाने तद्दन खोट्या आणि कल्पित बातम्याही छापून आणल्या जात होत्या. यातून संबंधितांना शरद पवार कळलेच नसल्याचे माझे निरीक्षण आहे. शेवटी कोरोना कमी झाल्यावर महामंडळाच्या बैठकीत ९४ वे नियोजित संमेलन नाशिक येथे घेण्याचे निश्चित झाले. तेव्हा त्या संस्थेच्या अध्यक्षाने दुसऱ्याचे नाव सांगून चक्क बघून घेण्याची धमकी दिली. यातून त्यांचा हेतू शुद्ध नव्हता हे स्पष्ट झाल्याचेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार निधी नको, लोकवर्गणी हवी
नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचे ९४ साहित्य संमेलन आयोजनाचे निमंत्रण महामंडळाने स्वीकारले. तेव्हा सरकारकडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता नसून, १६ ते १७ लाख रुपये मिळतील असे लक्षात आणून दिले. काटकसर करून संमेलन केल्यास खर्च जास्त येणार नसल्याचेही स्पष्ट केले. आयोजकांनी छगन भुजबळ यांना स्वागताध्यक्ष केले. त्यानंतर निधीसंकलनाचा भार त्यांच्यावर टाकला. त्यांनी सरकारकडून ५० लाख मिळविले. तसेच नाशिक जिल्ह्यातील आमदारांकडून आमदार निधी जमा केला. हे पूर्णत: चुकीचे आहे. राज्य शासन ५० लाख रुपये मदत करते, आमदार निधीही राज्य शासनाचाच असतो. त्यामुळे नाशिकच्या आयोजकांनी निधीसाठी लोकवर्गणीचा मार्ग अनुसरणे योग्य होते. मात्र त्यांनी सर्व भार स्वागताध्यक्षांवर टाकला हे चुकीचे असल्याचे कौतिकराव ठाले म्हणाले.

संमेलनाचे आयोजन निश्चित नाही
नाशिक येथील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, याविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येणार का? सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत का? हे पाहणे आवश्यक आहे. संमेलन रद्द करायचे की घ्यायचे याविषयीचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत होईल, असेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Dhandewaika; Allegation of Kautikrao Thale Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.