शिवसेना कुटुंबात भांडणं लावण्याचं कट कारस्थान; रामदास कदमांचा मनसेवर थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:44 PM2021-09-19T12:44:00+5:302021-09-19T12:59:00+5:30

नगराध्यक्ष वैभव खेडेकर(Vaibhav Khedekar) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन कदमांनी केले आहे.

Conspiracy to cause quarrel in Shiv Sena family; Ramdas Kadam directly accuses MNS | शिवसेना कुटुंबात भांडणं लावण्याचं कट कारस्थान; रामदास कदमांचा मनसेवर थेट आरोप

शिवसेना कुटुंबात भांडणं लावण्याचं कट कारस्थान; रामदास कदमांचा मनसेवर थेट आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देखेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभुल करणारे आरोप केले आहेतआपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछुटपणे आरोप केले आहेतमहाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही.

खेड -  किरीट सोमय्या यांना भेटून अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली हा जावई शोध वैभव खेडेकर यांनी लावलेला दिसतो. रामदास कदम कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नसतो, मी सांगून समोरुन अंगावर जातो. होय! प्रसाद कर्वे यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी मी उपयोग करुन घेतला. बाकी माझा व त्यांचा कोणताही संबंध नाही. किरीट सोमय्या यांना भेटण्याचा किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कट कारस्थान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे असा टोला शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी मनसे सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना लगावला.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर(Vaibhav Khedekar) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन करत रामदास कदम म्हणाले की, वैभव खेडेकर हे मनसे पक्षाचे आहेत की राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे.  क वर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभुल करणारे आरोप केले आहेत. माझी बदनामी करणारे जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बाबतीत गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछुटपणे आरोप केले आहेत अशा शब्दात त्यांनी खेडेकरांचे आरोप फेटाळून लावलेत.  

तसेच खेडेकर यांच्या विरोधात जे आरोप केले होते, त्या संदर्भात ते न्यायालयात गेले होते. या प्रकरणी कोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला तर त्याला १ महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली असे भासवून शिमगा सण त्यांनी साजरा केला, याचे मला आश्चर्य वाटते. इंधन घोटाळा कुणी केला? नगरपरिषदेच्या पैशांची लूट कोणी केली? हे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सांगायला हवे होते, पुढे चौकशीमध्ये योग्य ते निष्पन्न होईलच असंही रामदास कदम म्हणाले.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतून तिकीट मागण्यासाठी झिजवल्या त्या नेत्याच्या मैत्रीचा हा परीणाम असावा असे वाटते. निवडणुकीपुर्वीच मी पत्रकार परीषद घेऊन यापूढे मी कोणतेही पद घेणार नाही असे जाहिर केले होते. त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते. महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही. अशा बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालीत नाही. आकाशाकडे बघून थुकले की, धुंकी आपल्याच तोंडावर उडते याचे भान वैभव खेडेकर यांना नाही. शेवटी सत्य हे आहे ते जनतेपुढे येईलच व भ्रमाचा भोपळा फुटेल असा विश्वास आ.रामदास कदम यांनी या पत्रकात शेवटी व्यक्त केला आहे.

Web Title: Conspiracy to cause quarrel in Shiv Sena family; Ramdas Kadam directly accuses MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.